वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान अलेनिया येथे होणाऱ्या 2024 च्या तुर्कीश चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 23 सदस्यांचा संघ जाहीर केला. भारतीय महिला फुटबॉल संघ सोमवारी तुर्कीला रवाना झाला.
या स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाने 2019 आणि 2021 साली असे दोन वेळेला आपला सहभाग दर्शविला होता. ही स्पर्धा आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रतेची म्हणून राहिल. या स्पर्धेसाठी 23 सदस्यांच्या भारतीय महिला संघा करीता आठवडाभराचे सरावाचे शिबिर आयोजित केले होते.
तुर्कीश महिलांच्या फुटबॉल चषक स्पर्धेत एकूण 4 संघांचा समावेश आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचा पहिला सामना इस्टोनिया बरोबर 21 फेब्रुवारीला, 24 फेब्रुवारीला हाँगकाँग बरोबर तर 27 फेब्रुवारीला कोसोव्ह बरोबर होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून या स्पर्धेत गुणतक्त्यातील आघाडीचा संघ विजेता म्हणून घोषित करण्यात येईल.
भारतीय महिला फुटबॉल संघ : गोलरक्षक – श्रेया हुडा, इलेंगबाम चानू, एम. मोनालिसादेवी. बचावफळी -एल. आशालतादेवी, रंजना चानू, दलिमा छिब्बर, जुली किशन, अस्ताम ओरॉन, शिल्कीदेवी हेमाम. मध्यफळी – अंजू तमंग, संगीता बसफोर, ए. कार्तिका, मनिषा, काजोल डिसोझा, इंदुमती के. आघाडी फळी – ग्रेस दांगमेई, सौम्या गुगलोथ, करिष्मा शिरवईकर, संध्या रंगनाथन, संजू, प्यारी झाझा, काव्या पी. आणि ज्योती.









