इंग्लंडला घरच्या मैदानावर हरवले : शेवटच्या टी 20 सामन्यात भारतीय महिलांचा पराभव
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
येथील एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी 20 सामन्यात भारतीय महिला संघाला 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. तरीही, टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 167 धावा केल्या. यानंतर इंग्लंडने विजयासाठीचे लक्ष्य 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. विशेष म्हणजे, महिला क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-20 मालिकेमध्ये विजय आहे. यापूर्वी, भारताने इंग्लंडविरुद्ध 6 द्विपक्षीय टी-20 मालिका गमावल्या होत्या.
प्रारंभी, या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, भारतीय महिला संघाने 20 षटकांत 7 गडी गमावत 167 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. शेफालीने 23 चेंडूत तिचे 11 वे टी 20 अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडच्या महिला गोलंदाजांचा समाचार घेताना तिने सर्वाधिक 41 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारासह 75 धावा केल्या. याशिवाय, रिचा घोषने 24 तर राधा यादवने 14 धावा केल्या. इतर भारतीय खेळाडूंनी मात्र निराशा केली. इंग्लंडकडून चार्ली डीनने सर्वाधिक 3 बळी घेतले.
भारतीय संघाच्या धावसंख्येला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्स गमावून 168 धावांचे लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून सोफिया डंकली आणि डॅनिएल वॅट व्हॉज या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. सोफिया डंकलीने 46 धावा केल्या, तर डॅनिएल 56 धावा करून बाद झाली. याशिवाय इंग्लंडची कर्णधार टॅमी ब्यूमोंटने संघासाठी 30 धावांचे योगदान दिले. भारतीय महिलांनी शानदार गोलंदाजी केली पण इंग्लंडने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. भारताकडून दीप्ती आणि अरुंधतीने प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताने 2006 मध्ये डर्बी येथे खेळल्या गेलेल्या एकमेव टी 20 सामन्यात इंग्लंडचा पराभव केला. तेव्हापासून, भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध मायदेशात आणि परदेशी भूमीवर कधीही टी20 मालिका जिंकली नव्हती. परंतु, यावेळी टीम इंडियाने मागील अपयश विसरून प्रथमच टी20 मालिका जिंकली. 20 वर्षीय श्री चरणीची मालिकावीर म्हणून निवड झाली. श्री चरणीने पदार्पणाच्या मालिकेत 5 सामन्यांमध्ये 10 बळी घेण्याचा पराक्रम केला. टी-20 मालिका जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता यजमान इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होईल, जी 16 जुलैपासून सुरु होईल.









