वृत्तसंस्था/ मुंबई
भारताच्या महिला अ क्रिकेट संघाने येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंड महिला संघावर केवळ 3 धावांनी थरारक विजय मिळविला. भारताच्या काश्वी गौतमने मोक्याच्या वेळी लागोपाठ दोन बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.
135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या गड्यासाठी उपकर्णधार होली अर्मिटेज (52) व यष्टिरक्षक फलंदाज सेरेन स्मेल (31) यांनी 70 धावांची भागीदारी केली तेव्हा इंग्लंड सहज विजय मिळविणार असे वाटले होते. पण भारताने मुसंडी मारत त्यांचे झटपट गडी बाद केले. काश्वीने स्मेल व इसी वाँग यांचे 18 व्या षटकात बळी मिळवित भारताला विजयाची संधी निर्माण करून दिली आणि अखेर 3 धावांनी रोमांचक विजय मिळविण्यात भारत यशस्वी ठरले. काश्वीने 23 धावांत 2 बळी मिळविले. या दोन संघांत तीन सामन्यांची मालिका होत आहे.









