वृत्तसंस्था/ चेस्टर-ले-स्ट्रीट, ब्रिटन
लॉर्ड्सवरील कठीण परिस्थितीत फटक्यांच्या अयोग्य निवडीमुळे चांगली कामगिरी न घडल्यानंतर आज मंगळवारी येथे होणाऱ्या मालिकेच्या निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुनऊज्जीवित इंग्लंडचा सामना करताना भारतीय महिला संघाला त्यांचे आव्हान पेलावे लागेल.
पाहुण्या भारताने फलंदाजीत चांगले प्रदर्शन करून पहिला सामना चार गड्यांनी जिंकला परंतु शनिवारी ब्रिटनच्या राजधानीत झालेल्या आणि पावसाचा फटका बसलेल्या सामन्यात त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आणि तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. त्यामुळे शेवटचा एकदिवसीय सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. विश्वचषक स्पर्धा दोन महिन्यांनी सुरू होणार असल्याने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. 50 षटकांच्या सामन्यांची ही स्पर्धा 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये श्रीलंकेतील पाच शहरे आणि भारत यजमानपद भूषविणार आहे.
भारत दुसऱ्या सामन्यात उतरला तेव्हा तो आघाडीवर होता आणि संघाची अष्टपैलू ताकद आणि काही बड्या खेळाडूंच्या फॉर्ममुळे या सामन्यात संघ मालिकेचे जेतेपद मिळवेल अशी अपेक्षा होती. तथापि, फटक्यांची खराब निवड आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थता यामुळे त्यांच्या योजनांमध्ये अडथळा निर्माण झाला. त्यामुळे 29 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना त्यांना आठ बाद 143 धावाच करता आल्या. गोलंदाजही अपयशी ठरले. कारण इंग्लंडच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी बरीच षटके शिल्लक असताना सोपा पाठलाग पूर्ण केला. आता निर्णायक सामन्यात उतरण्यापूर्वी भारताने विचार करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
उपकर्णधार स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा वगळता लॉर्ड्सवर सोफी एक्लेस्टोन, एम. आर्लोट आणि लिन्से स्मिथ यांच्यासारख्या गोलंदाजांविरुद्ध त्यांच्या फलंदाजांच्या त्रुटी उघड्या पडल्या आणि गोलंदाजी देखील अपेक्षांनुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरली. अचूक एक्लेस्टोनच्या नेतृत्वाखालील माऱ्याचा सामना करताना भारतीय फलंदाजांना विशेषत: फिरकी गोलंदाजांविऊद्ध संघर्ष करावा लागला आणि किमान चेस्टर-ले-स्ट्रीटवर संथ गोलंदाजांविऊद्ध चांगली कामगिरी करण्याची आशा संघ बाळगून असेल.
पाहुण्या संघाला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी मनधाना, कर्णधार हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, प्रतीका रावल आणि हरलीन देओल यापैकी किमान दोन खेळाडूंना मोठी खेळी करावी लागेल. खालच्या फळीत रिचा घोष आणि दीप्ती यांच्याकडून त्यांना पाठिंबा मिळेल. फिरकी गोलंदाज येण्यापूर्वी संघ वेगवान गोलंदाजांनी लवकर यश मिळवावे याकरिता प्रयत्न करेल. इंग्लंडचा विचार केला, तर मालिकेच्या सुऊवातीच्या सामन्यापेक्षा ते खूपच चांगल्या स्थितीत दिसले आहेत आणि एक्लेस्टोन आणि आर्लोटसारख्या गोलंदाज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटसह एमी जोन्स आणि टॅमी ब्यूमोंटसारख्या फलंदाजांनाही संघाच्या कामगिरीत चांगले योगदान देण्याची इच्छा असेल.
एकंदरित परिस्थितीत थोडीशी तणावाचीही भर पडेल. दुसऱ्या सामन्यात त्याची झलक पाहायला मिळालेली असून जेमिमाने स्ट्रायकरच्या बाजूने चेंडू फेकल्यानंतर हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने टॅमी ब्यूमोंटने मैदानात अडथळा आणल्याचा दावा करून दाद मागितली होती. भारतीय संघाच्या दाव्यानुसार, टॅमीने जाणूनबुजून थ्रो अडविला होता. परंतु तिसऱ्या पंचांनी रिप्ले नीट पाहिल्यानंतर ती नाबाद असल्याचा निष्कर्ष काढला, ज्यामुळे पाहुण्या संघात निराशा पसरली.
शंघ-भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्रीचरणी, शुची उपाध्याय, अमनजोत कौर, अऊंधती रे•ाr, क्रांती गौड, सायली सतघरे.
इंग्लंड : नॅट सीव्हर-ब्रंट (कर्णधार), एम. आर्लोट, टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचियर, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, अॅलिस डेव्हिडसन-रिचर्ड्स, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, एमा लॅम्ब, लिन्सी स्मिथ.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वा.









