वृत्तसंस्था/ दुबई
2024 साली बांगलादेशमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाने आपली थेट पात्रता सिद्ध केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचा दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. या प्रत्येक गटातील पहिले तीन संघ त्याचप्रमाणे यजमान बांगलादेश आणि पाकिस्तान यांना बांगलादेशमधील होणाऱ्या आगामी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाटी थेट प्रवेश देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका तर गट 2 मध्ये इंग्लंड, भारत आणि विंडीज हे संघ पहिल्या तीन स्थानावर होते. मात्र श्रीलंका आणि आयर्लंड या संघांना आपली थेट पात्रता सिद्ध करता आली नाही. आयसीसीच्या सांघिक मानांकनात सध्या लंका आठव्या तर आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे.









