वृत्तसंस्था/ रांची
येथे झालेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद भारतीय महिला हॉकी संघाने पटकाविले. रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने विद्यमान विजेत्या जपानचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत अजिंक्यपद मिळविले.
रविवारचा अंतिम सामना प्रकाशझोताच्या समस्येमुळे 50 मिनिटे उशीरा सुरू करण्यात आला. या सामन्यात भारतातर्फे संगीता कुमारी, नेहा, लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यानी प्रत्येकी 1 गोल केला. भारतीय महिला हॉकी संघाने दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. 2016 साली सिंगापूरमध्ये झालेल्या पहिल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये भारताने दर्जेदार खेळ करत अजिंक्यपद मिळविले होते. त्याप्रमाणे जपानच्या महिला हॉकी संघाने ही स्पर्धा 2013 आणि 2021 अशी दोनवेळा जिंकली होती.
विद्यमान विजेत्या जपानला या अंतिम सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. अंतिम सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर 17 व्या मिनिटाला भारताचे खाते संगीता कुमारीने उघडले. सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती. पण दिपीकाला या संधीचा फायदा उठविता आला नाही. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जपानच्या शिहोने गोल नोंदविला पण पंचानी तो नियमबाह्य ठरविला. कारण हा गोल नोंदविताना चेंडूचा स्पर्श खेळाडूच्या हाताला झाल्याने जपानला खाते उघडता आले नाही. मध्यतंरापर्यंत भारताने जपानवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती.
भारताचा दुसरा गोल नेहाने 46 व्या मिनिटाला नोंदविला. 57 व्या मिनिटाला लालरेमसियामीने मैदानी गोल केला. सामना संपण्यास केवळ काही सेकंद बाकी असताना वंदना कटारीयाने जपानच्या बचाव फळीतील आणि गोलरक्षकाला हुलकावणी देत चौथा आणि शेवटचा गोल नोंदवून चॅम्पियन्स करंडकावर आपल्या संघाचे नाव कोरले तर जपानचे आवाहन संपुष्टात आणले.
या स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या चीनने दक्षिण कोरियाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात चीनतर्फे चेनने तिसऱ्या मिनिटाला तर लुओने 47 व्या मिनिटाला गोल केले. दक्षिण कोरियातर्फे एकमेव गोल 38 व्या मिनिटाला सुझीन अॅनने केला.









