पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनवर 3-2 ने मात, निधीचे अप्रतिम गोलरक्षण
मस्कत, ओमान
नियमित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनचा 3-2 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा कनिष्ठ महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये कोरियाने जपानचा 3-2 अशा फरकाने हरवून तिसरे स्थान घेतले.
नियमित कालावधीत जिनझुआंग टॅनने 30 व्या मिनिटाला चीनला आघाडीवर नेले. पण तिसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला कनिका सिवाचने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली. बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय गोलरक्षक निधीने चिनी खेळाडूंचे तीन फटके थोपवत भारताला जेतेपद मिळवून दिले. या जेतेपदानंतर हॉकी इंडियाने संघातील प्रत्येक खेळाडूला 2 लाख तर साहायक स्टाफला प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
पहिल्या सत्रात भारत व चीन दोन्ही संघांतील खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करीत गोल नोंदवण्यासाठी प्रयत्न केले. बॉल पझेशनच्या बाबतीत दोन्ही संघांकड समानता होती. अनेक संधी निर्माण करूनही दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही. भारताला दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. चीनने ते व्यवस्थित थोपवले. दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक सुरुवात करून वर्चस्व मिळविले. पण गोलची संधी त्यांना मिळविता आली नाही. या सत्रात शेवटी चीनची बाजू थोडी वरचढ झाली आणि त्यांनी भारतीय बचावफळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केले. या सत्रातील 14 सेकंद बाकी राहिले असताना चीनला पेनल्टी स्ट्रोकच्या रूपात एक सुवर्णसंधी मिळाली. जिनझुआंग टॅनने त्यावर अचूक गोल नोंदवत चीनला आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सत्रात भारताने आक्रमक खेळ करीत सामन्यावर नियंत्रण मिळविले. दीपिकाने कौशल्यपूर्ण ड्रिबल करीत चिनी बचावफळीला भेदून आगेकूच केली. दीपिकाने मारलेला ड्रॅगफ्लिक चिनी गोलरक्षकाने अनेकदा अप्रतिम बचाव केला. 41 व्या मिनिटाला सुनेलिता टोपो व दीपिका यांनी सफाईदार पासेस देत आगेकूच केली आणि सर्कल क्षेत्रात असणाऱ्या कनिका सिवाचकडे चेंडू सोपवला. तिने शानदार मैदानी गोल नोंदवत भारताला बरोबरीत आणले. चौथ्या सत्रात दोन्ही संघांनी विजयी गोल नोंदवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दहा मिनिटे असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर दीपिकाने मारलेला फटका वाईड गेला. काही क्षणानंतर चीननेही पेनल्टी कॉर्नर वाया घालविला. या सत्रातही विजयी गोल नोंदवता आला नसल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. शूटआऊटमध्ये साक्षी राणा, इशिका, सुनेलिता यांनी भारताचे गोल केले. भारतीय गोलरक्षक निधीने लिहांग वांग, जिंगयी लि व दान्दन झुओ यांचे पेनल्टी अचूक थोपवत भारताचे विजयासह जेतेपदही निश्चित केले.









