वृत्तसंस्था/राजगीर (बिहार)
येथे झालेल्या आशियाई रग्बी अमिराती 20 वर्षांखालील वयोगटाच्या रग्बी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय महिला संघाने कांस्यपदक पटकाविले. कांस्यपदकासाठीच्या झालेल्या लढतीमध्ये भारताने उझ्बेकचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये चीनने सुवर्णपदक तर पुरुषांच्या विभागात हाँगकाँगने सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या 20 वर्षांखालील वयोगटातील खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली. तिसऱ्या स्थानासाठी खेळविण्यात आलेल्या प्ले ऑफ सामन्यात भारताने उझ्बेकीस्तानचा 12-5 अशा फरकाने पराभव करत कांस्यपदक घेतले. भारतीय महिला संघाला चीनविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चांगलेच झगडावे लागले. या सामन्यात चीनने भारतीय महिला संघाचा 28-7 असा पराभव केला. उझ्बेकविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील भूमिकाने तसेच गुरियाकुमारी यांनी शानदार कामगिरी करत सुरुवातीला उझ्बेकवर 12-0 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर उझ्बेकच्या खेळाडूंना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. उझ्बेककडून केवळ पाच गुण नोंदविले गेले. त्यामुळे भारतीय महिला संघाने हा सामना 12-5 अशा फरकाने जिंकत कांस्यपदकावर मोहोर उठविली. भारतीय महिला संघाला या स्पर्धेत बलाढ्या चीन आणि हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारतीय महिलांनी प्रथमच सहभाग दर्शवून कांस्यपदक मिळविले.









