इंग्लंडपाठोपाठ यजमान संघाचाही 3-0 ने पराभव
वृत्तसंस्था/ बार्सिलोना
भारतीय महिला हॉकी संघाने प्रभावी कामगिरी करत यजमान स्पेनचा 3-0 असा सहज पराभव करून 100 व्या वर्धापनदिनानिमित्त स्पॅनिश हॉकी महासंघाने आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. वंदना कटारिया (22 वे मिनिट), मोनिका (48 वे मिनिट) आणि उदिता (58 वे मिनिट) यांनी गोल केल्याने भारत रविवारी अपराजित राहिला.
इंग्लंडविऊद्धच्या शनिवारच्या सामन्यातील यशावर स्वार होऊन गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या भारताने पहिल्या सत्रात जोरदार सुऊवात केली. लालरेमसियामीच्या हॅट्ट्रिकमुळे त्यांना इंग्लंडविरुद्ध 3-0 ने विजय नोंदविता आला होता. भारतीयांनी सावधपणे सुऊवात करताना लहान, अचूक पाससह शिस्तबद्ध रचना राखली. यामुळे त्यांना प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात मुसंडी मारता आली. पण पहिल्या सत्रामध्ये पाहुण्यांना गोल करता आले नाहीत. पहिल्या सत्राच्या शेवटच्या पाच मिनिटांत स्पेननेही काही चांगल्या संधी निर्माण केल्या होत्या. पण भारताची कर्णधार आणि गोलरक्षक सविताने चांगल्या पद्धतीने बचाव करून प्रतिस्पर्ध्यांना रोखले.
भारताने दुसऱ्या सत्रात सुरुवातीपासून वर्चस्व ठेवले आणि 22 व्या मिनिटाला सुशीलाने सुरेख संधी साधून जोरदार आक्रमण केले. तिने नेहा गोयलला चांगला पासही दिला होता, पाससह मदत केली, परंतु नेहाचा फटका स्पॅनिश गोलरक्षक क्लारा पेरेझच्या पॅडला लागून वळला. इंग्लंडविऊद्धच्या सामन्यातील ‘स्टार’ लालरेमसियामीने सदर चेंडू ताब्यात घेऊन तो फटकावला आणि चेंडूला जाळ्यात ढकलण्यासाठी हलकासा स्पर्श करण्याच्या अगदी योग्य स्थितीत असलेल्या वंदनाने पुढची कामगिरी बजावली.
या आघाडीने भारताला आक्रमणाला धार येऊन त्यांनी स्पेनवर दबाव वाढवला. स्पेनच्या गोलरक्षणासाठी पेरेझच्या जागी आलेल्या मारिया ऊईझला पेनल्टी कॉर्नरवर चकवून गोल करत मोनिकाने भारताची आघाडी वाढवली. 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर भारताने जोरदार बचावही केला. दीप ग्रेस एक्का, निक्की प्रधान आणि सुशीला चानू यांनी स्पॅनिश आक्रमण रोखून धरले, तर आघाडीपटूंनी तिसरा गोल नोंदविण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. शेवटी सामना संपण्यास दोन मिनिटे असताना ही संधी आली. यावेळी उदिताने संयम दाखविण्याबरोबर उत्तम ड्रिब्लिंग कौशल्यासह चेंडू गोलमध्ये सारला.









