खो खो विश्वचषक 2025 : भारतीय महिलांचा मलेशियावर 80 गुणांचा शानदार विजय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांच्या हॅट्रिकसह अ गटात अव्वल स्थान मिळवताना प्रत्येक सामन्यात गुणांची लयलूट केली. मलेशियाविरुध्द झालेल्या सामन्यात भारताच्या संघाने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 4 ड्रीम रन मिळवत संघाला संरक्षणात सुध्दा मजबूत स्थिती मिळवून दिली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाने त्यांच्या अप्रतिम ड्रीम रनने सामन्याची सुरुवात केली. मध्यंतराला भारताने 44-06 अशी 38 गुणांची आघाडी घेत आपण पुन्हा एकदा गुणांची लयलूट करू असा जणू इशाराच दिला. गेल्या दोन सामन्यात भारताने 175 व 100 गुण मिळवत एक आगळा वेगळा विश्वविक्रम केला होता. आज सुध्दा भारताने गुणांची शंभरी गाठत विजयासह शतकी गुणांची हॅट्रिक केली. भारताने हा सामना 100-20 असा 80 गुणांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने सामन्याची सुरुवात बचावातील मजबूत कामगिरीसह केली. बचावपटू भिलार ओपिनाबेन आणि मोनिकाच्या ड्रीम रनने सामन्याचा स्वरूप पालटवले. पहिल्या टर्नमध्ये 5 मिनिटे 50 सेकंद बचाव केल्यानंतर सामन्याचा पहिला डाव 6-6 अशा बरोबरीत संपला. त्यानंतर प्रियांका, नीतू आणि मीनू यांनी पहिल्या डावाच्या शेवटी शानदार कामगिरी करत संघाचा आत्मविश्वास वाढवला.
दुसऱ्या टर्नमध्ये खेळाच्या फक्त 27 व्या सेकंदाला मलेशियाच्या पहिल्या गटातील सर्व खेळाडूंना बाद करण्यात आले. यामुळे भारतीय संघाला मोठा आघाडी घेण्यासाठी संधी मिळाली. मोनिका आणि वझीर निर्मला भाटी यांनी आक्रमणात संघाला प्रचंड बळ दिले. मलेशियाच्या संघासाठी एंग झी यी आणि लक्षिता विजय यांनी संघाला प्रतिकाराची संधी मिळवून दिली. मलेशियाला ड्रीम रन साध्य करण्याची संधी मिळाली होती, पण 1 मिनिट 4 सेकंदांनी ते कमी पडले. तिसऱ्या टर्नमध्ये सुभाष्री सिंगने भारतासाठी आणखी एक ड्रीम रन मिळवला. या डावात भारतीय संघाने 4 मिनिटे 42 सेकंद शानदार संरक्षण केले. ज्यामुळे अंतिम टर्नसाठी संघाने मोठी आघाडी घेतली. तिसऱ्या टर्ननंतर स्कोअर 48-20 असा होता. चौथा डावही भारतीय संघासाठी आक्रमण करताना तितकाच प्रभावी ठरला. सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवत भारतीय संघाने 80 गुणांच्या फरकाने मलेशियाला पराभूत केले.
दक्षिण कोरिया, अमेरिका बरोबरी
शेवटच्या साखळी सामन्यात पुरुष गटातील चुरशीच्या लढतीत दक्षिण कोरिया विरुद्ध अमेरिका हा सामना 62-62 असा बरोबरीत झाला. परंतु क गटात बांगलादेश व श्रीलंकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. आणखी एका चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मलेशियावर 35-34 अशी एका गुणाने मात केली. परंतु ड गटातही इंग्लंड व केनियाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला गटातही आज अन्य सामने एकतर्फीच झाले.









