ऑस्ट्रेलियन महिला संघाचा 8 गडी राखून विजय : लिचफिल्ड, बेथ मुनी, सदरलँडची अर्धशतके
वृत्तसंस्था/ चंदीगड
रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला 8 गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 281 धावांचा डोंगर उभारला. विजयासाठीचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघाने 44.1 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील दुसरा सामना दि. 17 रोजी होईल. दरम्यान, 80 चेंडूत 88 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या लिचफिल्डला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या 150 व्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रतिका रावल आणि स्मृती मानधनाने दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने 114 धावांची भागीदारी केली. प्रतिकाने 6 चौकारासह 64 तर स्मृतीने 58 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या हरलिन देओलने आक्रमक फलंदाजीचा धडाका लावत केवळ 57 चेंडूत 54 धावा केल्या. तिच्या या खेळीत 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. याशिवाय, रिचा घोषने 25, दीप्ती शर्माने 20 तर राधा यादवने 19 धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने मात्र निराशा केली. तिला 11 धावा करता आल्या. भारतीय संघाने 50 षटकांत 7 गडी गमावत 281 धावा केल्या.
कांगारुंचा सहज विजय
टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 282 धावांचे टार्गेट ऑस्ट्रेलियन महिलांनी 44.1 षटकांतच पूर्ण केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार एलिसा हिली 27 धावा काढून बाद झाली. यानंतर लिचफिल्ड आणि एलिसा पेरी यांनी संघाचा डाव सावरला. लिचफिल्डने शानदार खेळी साकारताना 80 चेंडूत 14 चौकारासह 88 धावा केल्या. पण, शतकाच्या उंबरठ्यावर असताना तिला स्नेह राणाने बाद केले. एलिसा पेरीला दुखापत झाल्याने ती पॅव्हेलियनमध्ये परतली. लिचफिल्ड बाद झाल्यानंतर बेथ मुनी आणि अनाबेल सदरलँड या दोघींनी शतकी भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मुनीने 9 चौकारासह नाबाद 77 तर सदरलँडने 6 चौकारासह 54 धावांचे योगदान दिले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ 50 षटकांत 7 बाद 281 (प्रतिका रावल 64, स्मृती मानधना 58, हरलिन देओल 54, रिचा घोष 25, स्कट 2 बळी)
ऑस्ट्रेलियन महिला संघ 44.1 षटकांत 2 बाद 282 (लिचफिल्ड 88, एलिस पेरी 30, बेथ मूनी नाबाद 77, सदरलँड नाबाद 54, क्रांती गौड आणि स्नेह राणा प्रत्येकी 1 बळी).









