वृत्तसंस्था/ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा 5 गडी राखून पराभव झाला. टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली, मात्र संघ अवघ्या 100 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने 16.2 षटकांत सामना जिंकला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मेगन स्कटने 19 धावांत 5 बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. उभय संघातील दुसरा सामना दि. 8 रोजी ब्रिस्बेन येथे होईल.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रिया पुनिया आणि स्मृती मानधना ही सलामीची जोडी अपयशी ठरली. मानधना अवघ्या 8 धावा करून बाद झाली. तर प्रियाला 3 धावा करता आल्या. हरलीन देओल 19 धावा करून आऊट झाली. तिनं 34 चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीतने 17 धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 42 चेंडूत 23 धावा केल्या. रिचा घोषलाही केवळ 14 धावा करता आल्या. तळाच्या फलंदाजांनीही हजेरी लावण्याचे काम केल्याने संपूर्ण संघ 100 धावांत ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मेगन स्कटने 19 धावांत 5 बळी घेतले.
भारताने विजयासाठी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघालाही संघर्ष करावा लागला पण नंतर त्यांनी 16.2 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यता विजयी टार्गेट पूर्ण करत विजय गमावला. कांगारुंसाठी लिचफिल्ड आणि जॉर्जिया सलामीला आल्या. जॉर्जियाने नाबाद 46 धावा केल्या. तिनं 42 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. लिचफिल्डने 35 धावांचे योगदान दिले. बेथ मुनी आणि एलिस पेरी काही विशेष करू शकल्या नाहीत. दोघीही 1-1 धावा करून बाद झाल्या. गार्डनर 8 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. टीम इंडियाकडून रेणूका सिंगने 3 तर प्रिया मिश्राने 2 गडी बाद केले.









