दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने तिरंगी टी-20 मालिका आजपासून
वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन
भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिकेतील ‘टी-20 तिरंगी मालिके’ला आज गुरुवारी यजमानांविरुद्धच्या सामन्याने सुऊवात होत आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत अनेक त्रुटी उघड्या पाडल्यानंतर आता तिन्ही विभागांमध्ये सुधारणा करण्यास भारत उत्सुक झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारीमध्ये होणार असलेल्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेस अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कर्णधार हरमनप्रीत कौर दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविऊद्धच्या या तिरंगी मालिकेची सुऊवात विजयाने करण्यास निश्चितच उत्सुक झालेली असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10.30 वाजता सामन्याला सुऊवात होईल.
अनुभवी झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून भारताचा मध्यमगती गोलंदाजीचा अननुभवी विभाग संघर्ष करत आहे. यामुळे अनुभवी मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेचा तब्बल 15 महिन्यांनंतर आश्चर्यकारकरीत्या संघात समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर, 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर शिखाला वादग्रस्तरीत्या वगळण्यात आले होते. 33 वषीय शिखाची ताकद स्विंग गोलंदाजी असून भारतीय माऱ्याची धार वाढण्यासाठी तिला लवकर लय सापडणे अत्यावश्यक आहे. अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्रकारही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेला मुकल्यानंतर संघात परतली आहे.
गेल्या सहा महिन्यांत संघाची महत्त्वाची गोलंदाज राहिलेली रेणुका सिंग आणि डावखुरी मध्यमगती गोलंदाज अंजली सरवानी यांनी ऑस्ट्रेलियाविऊद्ध अधूनमधून चांगला मारा केला होता. त्यांच्याप्रमाणे फिरकी गोलंदाजांनाही सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. भारतातर्फे दीप्ती शर्माने मात्र नियमित बळी घेतलेले आहेत. 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत भाग घेतलेला असल्याने शेफाली वर्मा आणि रिचा घोष या फटकेबाजांना भारत मुकणार आहे. पण त्यांच्या अनुपस्थितीमुळे इतर खेळाडूंना पडताळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
सब्बिनेनी मेघना ही स्मृती मानधनासोबत सलामीला येण्याची, तर तर यास्तिका भाटिया यष्टीरक्षकाची जबाबदारी पेलण्याची शक्यता आहे. भारताला तऊण रिचामध्ये एक आवश्यक ‘फिनिशर’ सापडला होता. तिच्या अनुपस्थितीत कर्णधार हरमनप्रीतवर मधल्या फळीला आधार देण्याची जबाबदारी राहणार आहे. राष्ट्रकुलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या जेमिमा रॉड्रिग्सवरही याबाबतीत भर राहणार आहे.









