दुसऱ्या वनडेत बांगलादेशवर 108 धावांनी दणदणीत विजय
वृत्तसंस्था/ मिरपूर
भारत आणि बांगलादेश महिला संघादरम्यान खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने तब्बल 108 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 120 धावांवर गारद झाला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरा व निर्णायक सामना दि. 22 रोजी मिरपूर येथे होईल. दरम्यान, 86 धावा व चार बळी घेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षठकात आठ विकेटच्या मोबदल्यात 228 धावा केल्या. सलामीवीर प्रिया पुनिया 7 धावांवर स्वस्तात बाद झाली. यास्तिका भाटिया 15 धावांवर बाद झाल्याने भारताची 2 बाद 40 अशी स्थिती झाली होती. स्मृती मानधनाने 58 चेंडूत 4 चौकारासह 36 धावांची खेळी साकारली. पण तिला मोठी खेळी करण्यात अपयश आले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 3 चौकारासह 52 धावा करताना शानदार अर्धशतक झळकावले. तर जेमिमा रॉड्रिग्जने 78 चेंडूत 9 चौकारासह 86 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. हरमनप्रीत व जेमिमाच्या शानदार खेळीमुळे भारताला दोनशे धावांचा टप्पा गाठता आला. ही जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर हरलीन देओलने 36 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. दिप्ती शर्माला खातेही उघडता आले नाही. स्नेह राणा एका धावावर धावबाद झाली. बांगलादेशकडून सुल्ताना खातून आणि नहिदा अख्तर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर मुर्फा अख्तर आणि रुबिया खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
बांगलादेशचा अवघ्या 120 धावांत खुर्दा
भारताने दिलेल्या 229 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. 38 धावांत बांगलादेशने तीन विकेट गमावल्या होत्या. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे बांगलादेशचा संघ 35.1 षटकांत 120 धावात तंबूत परतला. विशेष म्हणजे, जेमिमा रॉड्रिग्ज व देविका वैद्य यांच्या भेदक गोलंदाजीसमोर एकाही बांगलादेशच्या खेळाडूचा टिकाव लागला नाही. बांगलादेशकडून फरगना हक हिने सर्वाधिक 49 धावांची खेळी केली. रितू मौनी हिने 27 धावांचे योगदान दिले. या दोघींचा अपवाद वगळता एकाही बांगलदेशाच्या महिला खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने अवघ्या तीन धावांत चार विकेट घेतल्या. देविका वैद्यने 30 धावांत 3 गडी बाद केले. याशिवाय, मेघना सिंह, दिप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.









