वर्ल्ड कपमधील स्थान निश्चित, नवजोत कौरची हॅट्ट्रिक, कुजुर व ज्योतीचे प्रत्येकी 2 गोल
वृत्तसंस्था/ सालालाह, ओमान
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी फाईव्ज विश्वचषक पात्रता स्पर्धेत भारतीय महिलांनी विजयी घोडदौड कायम राखताना सोमवारी झालेल्या सामन्यात मलेशियाचा 9-5 असा धुव्वा उडवित अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारतीय कर्णधार नवजोत कौरने या सामन्यत हॅट्ट्रिक नोंदवली. याशिवाय भारताने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप हॉकी फाईव्ज स्पर्धेतील स्थानही निश्चित केले आहे
भारतातर्फे कर्णधार नवजोत कौरने (7, 10, 17 वे मिनिट) हॅट्ट्रिक, मारियाना कुजुर (9, 12 वे मिनिट), ज्योती (21 व 26 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 2, मोनिका दिपी टोप्पो (22 वे मिनिट), महिमा चौधरी (14 वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मलेशियाचे गोल झाती मोहम्मद (4 व 5 वे मिनिट), दायन नझेरी (10 व 20 वे मिनिट), अझिझ झफिराह (16) यांनी नोंदवले. हॉकी फाईव्जची पहिली विश्वचषक स्पर्धा मस्कतमध्ये पुढील वर्षी 24 ते 27 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
भारताने या सामन्यात आक्रमक सुरुवात केली असली तरी मलेशियाने सर्वप्रथम आघाडी घेतली. झाती मोहम्मदने हा गोल नोंदवला. पुढच्याच मिनिटाला मोहम्मदनेच मैदानी गोल नोंदवत मलेशियाची आघाडी 2-0 अशी केली. दोन मिनिटानंतर भारतीय कर्णधार नवजोतने गोल नोंदवत मलेशियाची आघाडी 1-2 अशी कमी केली. त्यानंतर कुजुरने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून भारताला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.
दोन्ही संघांनी एकमेकांवरील आक्रमण कायम राखले. नाझेरीने दहाव्या मिनिटाला गोल नोंदवून मलेशियाला आघाडीवर नेले. पण भारताने प्रतिआक्रमण करीत लागोपाठ दोन गोल नोंदवून मलेशियावर आघाडी घेतली. तिसरा व चौथा गोल नवजोत व कुजुर यांनी नेंदवले. पूर्वार्ध संपण्यास एक मिनिट बाकी असताना महिमा चौधरीने संघाचा पाचवा गोल करीत आघाडी 5-3 अशी केली.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर जोरदार आक्रमणे करीत काही धोकादायक चाली रचल्या. पण मलेशियाने झफिराहच्या गोलवर भारताची आघाडी 5-4 अशी कमी केली. यानंतर भारताने आणखी तीन गोल नोंदवत 8-5 अशी आघाडी घेतली. नवजोत, ज्योती, टोप्पो यांनी हे गोल केले. चार मिनिटांचा खेळ बाकी असताना ज्योतीने भारताचा नववा गोल नोंदवत शानदार विजय साकार केला. इंडोनेशिया व थायलंड या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजयी संघाविरुद्ध भारताची जेतेपदाची लढत होईल.