वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या टी-20 विश्वचषक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपूर्वी येथे झालेल्या सरावाच्या सामन्यात हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला बलाढय़ ऑस्ट्रेलियाकडून 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 129 धावा जमवल्या होत्या. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाची एकवेळ स्थिती 3 बाद 10 अशी केविलवाणी होती. भारताच्या शिखा पांडेने मेग लेनिंगला खाते उघडण्यापूर्वी बाद केले. तसेच तिने ताहिला मॅकग्राला 2 धावावर तंबूत धाडले. इलेसी पेरी धावचित झाली. बेथ मुनी आणि गार्डनर यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव थोडय़ापैकी सावरला. मुनीने 28 धावा जमवल्या. गार्डनर पूजा वस्त्रकरच्या गोलंदाजीवर बाद झाली. शिखा पांडेने या सामन्यात 9 धावात 2 गडी बाद केले. जॉर्जिया वेरहॅम आणि जेस जोनासन यांनी 9 गडय़ासाठी 50 धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियाने 129 धावांपर्यंत मजल मारता आली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारताचा डाव सुरुवातीला गडगडला. भारताच्या डावातील पहिल्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाच्या डार्सीने 3 गडी बाद केले. भारताची स्थिती 4 बाद 22 अशी होती. दीप्ती शर्माने नाबाद 19 धावा जमवल्या पण भारताला ऑस्ट्रेलियाचे 130 धावांचे आव्हान पेलवले नाही. भारताचा डाव 84 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलियाने हा सामना 44 धावांनी जिंकला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकात 8 बाद 129 (वेरहॅम नाबाद 32, जोनासेन नाबाद 22, शिखा पांडे 2-9), भारत सर्वबाद 84 (दीप्ती शर्मा नाबाद 19, डार्सी ब्राऊन 3 बळी).









