आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पहिल्या उपांत्य फेरीत थायलंडचा 74 धावांनी एकतर्फी धुव्वा, शफाली सामन्यात सर्वोत्तम, दीप्तीचे 3 बळी

वृत्तसंस्था /सिल्हेत-बांगलादेश
भारतीय महिला संघाने अपेक्षेप्रमाणे तडफदार खेळ साकारत थायलंड महिला संघाचा 74 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला आणि आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 6 बाद 148 धावांपर्यंत झेप घेतली. प्रत्युत्तरात थायलंड महिला संघाला 20 षटकात 9 बाद 74 धावांवर समाधान मानावे लागले.
थायलंडविरुद्ध या विजयाने भारताने सलग आठव्यांदा आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. यातील चार वेळा वनडे प्रकारात तर चारवेळा टी-20 प्रकारात भारताने हा पराक्रम गाजवला. 2012 पूर्वी ही स्पर्धा 50 षटकांच्या प्रकारात खेळवली जात होती.
थायलंडविरुद्ध सेमीफायनल जिंकणे भारतासाठी केकवॉक असेल, अशी अपेक्षा होती. ती पूर्णपणे खरी उतरली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभल्यानंतर 6 बाद 148 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना थायलंडचा संघ एकदाही विजयाच्या ट्रकवर दिसून आला नाही. अर्थात, थायलंडच्या संघाने भारताविरुद्ध प्राथमिक फेरीतील शेवटच्या सामन्याच्या तुलनेत येथे किंचीत सरस कामगिरी नोंदवली. त्या लढतीत थायलंड महिलांचा संघ 9 गडय़ांनी पराभूत झाला होता.
येथील उपांत्य लढतीत थायलंड महिला संघाने 8 षटकात 4 बाद 21 अशी दैना उडाल्यानंतरही त्यातून सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दीप्ती शर्माने (7 धावात 3 बळी) भेदक ऑफस्पिन गोलंदाजीच्या बळावर थायलंडला सातत्याने धक्के दिले. तिने नॅनापत, नाथकन चांथम, सोरनरिन यांना लागोपाठ षटकात बाद केले. याशिवाय, मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगने 6 धावात 1 बळी घेतला. तिने चनिदाचा त्रिफळा उडवत थायलंडला आणखी अपयशाच्या खाईत लोटले.
कर्णधार नरुएमोल (21) व नताया (21) यांनी पाचव्या गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, आवश्यक धावगती वाढत असताना ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला कायम राहिला. थायलंडचे केवळ दोनच फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले, याचा त्यांना प्रामुख्याने फटका बसला. ही जोडी बाद झाल्यानंतर मात्र फक्त सामन्याची औपचारिकता पूर्ण होणे बाकी होते. अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी थायलंडच्या तळाच्या फलंदाजांना सहज रोखले.
शफालीची फटकेबाजी
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर शफाली वर्माने 28 चेंडूत सर्वाधिक 42 धावा फटकावल्या. यात 5 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. शफालीने उपकर्णधार स्मृती मानधनासह 4.3 षटकात 38 धावांची सलामी दिली. त्यानंतर स्मृती मानधनाने फनिताच्या लो फुलटॉसवर मिडऑनवरील ऑनिचाकडे सोपा झेल दिला. शफालीने मात्र आपला धडाका त्यानंतरही कायम राखला. अंतिमतः ऑफस्पिनर सोरनरिच्या फ्लायटेड चेंडूवर तिने शॉर्ट मिडविकेटवर तैनात कर्णधार नरुएमोलकडे झेल दिला. भारताच्या बहुतांशी फलंदाजांनी खराब फटक्यावर आपली विकेट थायलंडला बहाल केली.
जेमिमा 27 धावांवर लाँगऑनवरील रोसेननकरवी झेलबाद झाली. त्यानंतर तिप्पोचने सलग षटकात दोन फलंदाज बाद केले आणि भारताची 18 व्या षटकाअखेर 5 बाद 132 अशी स्थिती झाली. तिप्पोचने रिचा घोषला पायचीत केले. तिने कर्णधार हरमनप्रीतला तंबूचा रस्ता दाखवला. तिच्या 30 चेंडूतील 36 धावांच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश राहिला. उत्तरार्धात पूजा वस्त्रकारने 13 चेंडूत 17 धावा केल्या. यामुळे भारताला 150 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले. थायलंडतर्फे तिप्पोचने 24 धावात 3 बळी घेतले. भारताने या सामन्यासाठी 3 बदल करत एस. मेघना, मेघना सिंग, किरण नवगिरे यांच्याऐवजी हरमनप्रीत, रेणुका ठाकुर व राधा यादव यांना संघात स्थान दिले.
संक्षिप्त धावफलक
भारतीय महिला संघ : 20 षटकात 6 बाद 148 (शफाली वर्मा 28 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 42, हरमनप्रीत कौर 30 चेंडूत 4 चौकारांसह 36, जेमिमा रॉड्रिग्यूज 26 चेंडूत 3 चौकारांसह 27, पूजा वस्त्रकार 13 चेंडूत नाबाद 17. अवांतर 8. सोरनरिन 4 षटकात 3-24, फनिता, थिपॅचा, नताया प्रत्येकी 1 बळी).
थायलंड महिला संघ : 20 षटकात 9 बाद 74 (नरुएमोल 41 चेंडूत 21, नताया 29 चेंडूत 21. अवांतर 10. दीप्ती शर्मा 4 षटकात 7 धावात 3 बळी, राजेश्वरी गायकवाड 4 षटकात 10 धावात 2 बळी, रेणुका सिंग, स्नेह राणा, शफाली वर्मा प्रत्येकी 1 बळी).
अंतिम फेरीत लंकेविरुद्ध मुकाबला

या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानविरुद्ध एका धावेने रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 6 बाद 122 धावा केल्यानंतर प्रत्युत्तरात पाकिस्तानला 20 षटकात 6 बाद 121 धावांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील निर्णायक अंतिम लढत उद्या (शनिवार दि. 15) खेळवली जाणार आहे.









