वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जर्मनी दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिला हॉकी संघाने निराशाजनक कामगिरी केली असून यजमानाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या व दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यातही त्यांना 0-2 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. सलग तिसऱ्या पराभवाने भारताने या दौऱ्याची सांगता केली. निके लॉरेन्झ (52 वे मिनिट) व चार्लोट स्टॅपेनहॉर्स्ट (54 वे मिनिट) यांनी जर्मनीचे गोल नोंदवले. याआधीच्या दोन सामन्यात भारताला चीनकडून 2-3 व जर्मनीकडून 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. चीनमधील हांगझोयू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने भक्कम बचावाचे प्रदर्शन करीत तिसऱ्या सत्रापर्यंत जर्मनीला 0-0 असे बरोबरीत रोखले होते. मात्र हा जोम चौथ्या व शेवटच्या सत्रात ओसरल्याने जर्मनीने जोरदार आक्रमण करीत गोलकोंडी फोडण्यात यश मिळवित दोन गोलांची नोंद केली.









