वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांनी पाकिस्तानचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत विजयी सुरुवात केली. काठमांडूतील दशरथ स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. भारताची पुढील लढत 10 सप्टेंबर रोजी मालदिवविरुद्ध होणार आहे.
या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला आतापर्यंत 27 सामने अपराजित राहिल्या आहेत. पाकची कर्णधार मारिया जमिल खानने स्वयंगोल नोंदवत भारताला बोनस गोल दिला तर अचूक संधी साधत दांगमेई ग्रेसने गोल नोंदवत भारताचा विजय निश्चित केला. जादा वेळेत सौम्या गगुलोथने डाव्या बगलेतून रंजनाकडून मिळालेल्या क्रॉस पासवर तिसरा गोल नोंदवून एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात भारतीय महिलांनीच पूर्ण वर्चस्व राखत चेंडू आपल्याच ताब्यात जास्तीत जास्त वेळ ठेवला होता.









