अंजू, सौम्याने नोंदवलेले गोल, भारताला जेतेपद पटकावण्याची संधी
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय महिला संघ तुर्कीतील अलान्या येथे सुरू लेल्या तुर्कीश महिला चषक फुटबॉल स्पर्धेचे आशियाबाहेरील विभागात पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळविण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी दुसऱ्या राऊंडरॉबिन सामन्यात हाँगकाँगचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. भारताने दोन सामन्यांत पूर्ण सहा गुण घेतले आहेत.
अंजू तमंग व सौम्या गुगुलोथ यांनी भारताचे गोल नोंदवले. इस्टोनियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नव्हते. दुसऱ्या स्थानावरील कोसोव्होविरुद्ध भारताचा शेवटचा राऊंडरॉबिन सामना होणार असून त्याला अंतिम सामन्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फिफा मानांकनात शंभराव्या स्थानावर असणाऱ्या कोसोव्होनेही दोन सामने जिंकून सहा गुण मिळविले आहेत. त्यामुळे या दोघांतील लढत विजेता निश्चित करणार आहे. मात्र गटामध्ये सरस गोलसरासरीच्या आधारे कोसोव्हो पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
पहिल्या पंधरा मिनिटात भारताने सामन्यावर नियंत्रण मिळविले आणि 19 व्या मिनिटाला गोलकोंडी फोडत पहिले यश मिळविले. हाँगकाँगची कर्णधार चिंग यी सिन हिच्याकडून बचावात झालेल्या चुकीचा लाभ घेतला. सिनकडून मनीषा कल्याणने चेंडू हिसकावून घेतला आणि तो अंजूकडे सोपविला. तिने गोलरक्षकाला हुलकावणी देत गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले. सामना पुढे सरकेल तसे भारताने पूर्ण नियंत्रण मिळविले आणि आशला देवीसह बचावफळीने उत्तम कामगिरी करीत हाँगकाँगला गोल करण्यापासून दूर ठेवले.
उत्तरार्धातील पहिल्या सत्रातच भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण मनीषाचा फटका क्रॉसबारला लागून परतला. नंतर अंजूनेही एक संधी वाया घालवली. भारतीय संघाला दुसऱ्या गोलसाठी 79 व्या मिनिटापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ई. पन्थोइ चानूने लांब पल्ल्यावरून प्यारी झाझाला चेंडू पुरविला. तिने हेडर केलेला चेंडू सौम्याच्या पुढ्यात पडला. तिने गोलरक्षकाला हुलकावणी देत घसरत जात उजव्या पायाने चेंडू गोलजाळीत धाडला.









