मुलाचा ताबा घटस्फोटित पतीला मिळाल्याने केला गुन्हा
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारतीय वंशाच्या एका महिलेवर डिस्नेलँडमध्ये 3 दिवसांच्या सुटीनंतर स्वत:च्या 11 वर्षीय मुलाची हत्या केल्याचा आरोप झाला आहे. 48 वर्षीय सरिता रामाराजू यांनी स्वत:च्या मुलाचा गळा चिरत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
हा गुन्हा सिद्ध झाल्यास सरिता यांना 26 वर्षे ते आजीवन कारावासाला सामोरे जावे लागू शकते. महिलेने 2018 मध्ये पतीकडून घटस्फोट घेतला होता. 19 मार्च रोजी रामाराजूला मॉटेलमधून चेकआउट करत स्वत:च्या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोपवायचे होते. परंतु त्यादिवशी सरिताने स्वत:च्या पूर्वाश्रमीच्या पतीला कॉल करत मुलाची हत्या केल्याचे आणि आत्महत्येसाठी गोळ्या घेतल्याचे सांगितले होते. यानंतर सांता एना पोलीस मॉटेलमध्ये पोहोचल्यावर एका बेडवर मुलगा मृत आढळून आला होता. मॉटेलच्या एका खोलीत एक मोठा चाकू मिळाला, जो तिने एक दिवसापूर्वीच खरेदी केला होता. अज्ञात पदार्थाच्या सेवनामुळे सरिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज मिळाल्यावर तिला अटक करण्यात आली आहे.
सरिता रामाराजू मागील वर्षापासून पूर्वाश्रमीचा पती प्रकाश राजूसोबत मुलाच्या ताब्यातून न्यायालयीन लढाई लढत होती. तर सरितावर पूर्वाश्रमीच्या पतीच्या कुठल्याही सल्ल्याशिवाय मुलाच्या वैद्यकीय प्रकृतीसंबंधी अन् शाळेसंबंधीचे निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने राजू यांच्याकडे मुलाचा ताबा दिला होता, तर सरिता रामाराजूला मुलाची भेट घेण्याचा अधिकार दिला होता. सरिता या फेयरफॅक्स, वर्जीनिया येथे राहत होत्या.









