ब्रिटनमधील घटना, वंशवर्चस्वाच्या भूमिकेतून कृत्य
वृत्तसंस्था / लंडन
भारतीय वंशाच्या एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. हा गुन्हा वांशिक वर्चस्ववादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटीश पोलिसांनी गुन्हेगाराचे व्हिडीओ छायाचित्र प्रसिद्ध केले असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न पेले जात आहेत. या घटनेमुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचा समाज संतप्त झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.
ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड विभागातील पार्क हॉल येथे ही घटना घडली. पिडीत महिला जखमी असून तिचा जबाब घेण्यात आला आहे. आपल्यावर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने नोंदविली आहे. संशयित व्यक्ती साधारणत: 30 वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला पकडण्यासाठी जनतेलाही साहाय्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वंशवादी गुन्हा म्हणून नोंद
हा गुन्हा वंशवादी अतिरेकी भूमिकेतून घडल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्याची नेंद वांशिकवाद प्रेरित गुन्हा अशी केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे. या कामासाठी ब्रिटीश पोलिसांनी विशेष पथकांची स्थापना केली असून ही पथके अनेक स्थानी पाठविण्यात आली आहेत. व्हिडीओ फूटेजची तपासणी केली जात असून साक्षीदारांशीही चर्चा केली जात आहे. व्हिडीओत गुन्हेगाराचा चेहरा स्पष्ट दिसत असून तो गोऱ्या कातडीचा असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याचा चेहरा दिसत असला तरी, तो कोठे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कसून शोध घेतला जात आहे.
गुप्तचरांचे साहाय्य
गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी गुप्तचरांचे साहाय्य घेतले जात आहे, अशी माहिती वेस्ट मिडलँड पोलिसांकडून देण्यात आली. ही घटना गंभीर आणि अत्याधिक निंदनीय आहे. ती वंशवादाशी संबंधित असल्याचे तिचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आम्ही गुन्हेगाराला पकडण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत आहोत. सर्वसामान्य लोकांनाही आम्हाला साहाय्य करावे. सध्या आम्ही अनेक मार्गांनी या गुन्ह्याचा तपास करीत आहोत, अशी माहिती गुप्तचर रोनन टायरर यांनी दिली.
चार आठवड्यांमधील दुसरी घटना
चार आठवड्यांपूर्वी ब्रिटनमध्ये एका शीख महिलेवर ओल्डबरी भागात वंशवादी वर्चस्वाच्या मनोवृत्तीतून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. अशाच प्रकारची ही घटना असल्याने एकंदर परिस्थिती गंभीर बनली आहे. वेस्ट मिडलँड भागात अशा घटनांचे प्रमाण वाढत असून ही ब्रिटीश कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे या भागातील स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
भारताकडूनही नोंद
या घटनांची नोंद भारत सरकारनेही घेतली असून भारतीय वंशाच्या नागरीकांना योग्य ती सुरक्षा देण्यात यावी, अशी सूचना ब्रिटीश सरकारला करण्यात आली आहे. अशा प्रकरणांमधील पिडीतांना न्याय मिळवून देण्यात कोणतीही कमतरता दाखविली जाणार नाही, असे आश्वासन ब्रिटीश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.









