अध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी मोइज्जू यांची घोषणा : चीनच्या अनुनयास प्रारंभ
वृत्तसंस्था/ माले
मालदीवची निवडणूक ही भारत आणि चीनमधील वर्चस्वाची लढाई ठरल्याचे चित्र दिसून आले होते. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते मोहम्मद मोइज्जू हे विजयी झाली आहेत. तर अध्यक्ष इब्राहिम सोलिह यांचा पराभव झाला आहे. मोइज्जू यांच्या विजयामुळे मालदीवमधील चीनचा प्रभाव वाढणार असल्याचे मानले जात आहे. परंतु अध्यक्ष होण्यापूर्वीच मोइज्जू यांनी भारताविरोधात भूमिका घेत चीनचा अनुनय सुरू केला आहे. मोइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैनिकांना बाहेर काढणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
या मुद्द्यावर राजनयिक पद्धतीने तोडगा काढणार असल्याचे मोइज्जू यांचे म्हणणे आहे. मोइज्जू हे पुढील महिन्यात औपचारिक स्वरुपात देशाचे अध्यक्ष होणार आहेत. अध्यक्षपद स्वीकारल्याच्या पहिल्या आठवड्यातच भारतीय सैनिकांची वापसी पाहणार असल्याचे वक्तव्य त्यांनी पेले आहे.
मोइज्जू हे चीनचे समर्थक मानले जातात. मालदीवचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी मी भारताला त्याचे सैनिक परत बोलाविण्याची विनंती करणार आहे. याच मुद्द्याला माझी सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय राजदूताची भेट घेत आम्हाला आमच्या सर्वोच्च प्राथमिकता जपण्याची गरज असल्याचे कळविले आहे. भारतीय राजदूतांनी या सूचनेला सकारात्मकपणे घेत याप्रकरणी मार्ग शोधण्याची तयारी दर्शविली आहे. मालदीवमध्ये किती भारतीय सैनिक तैनात आहेत याची कल्पना नसल्याचा दावा मोइज्जू यांनी केला आहे.
असुरक्षिततेची भावना
शतकांपासून मालदीव एक शांततापूर्ण देश राहिला आहे. आमच्या भूमीवर कधीच कुठले विदेशी सैन्य राहिलेले नाही. आमच्याकडे कुठलाच मोठा सैन्यतळ नाही. तसेच आमच्या भूमीवर कुठल्याही देशाचे सैन्य राहिल्यास आम्हाला सुरक्षित वाटत नाही. मी नेहमीच मालदीव समर्थक धोरणाचे पालन करणार आहे. आम्ही कुठल्याही देशाला खूश करण्यासाठी त्याची बाजू घेणार नाही. जो कुणी आमच्या धोरणांचा आदर करेल, तो आमचा चांगला मित्र असल्याचे मोइज्जू यांनी म्हटले आहे.









