वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) आशियाई खेळांसाठी 12 सदस्यीय संघाची घोषणा केली असून दुहेरीतील तज्ञ खेळाडू रोहन बोपण्णाच्या खांद्यावर पुन्हा एकदा आशियाई खेळांतील टेनिसमधील भारताच्या आशांचा भार असेल. आशियाई खेळांची सुऊवात 23 सप्टेंबर रोजी चीनमधील हांगझोऊ येथे होणार असून पुऊष संघात 43 वर्षीय बोपण्णाच्या व्यतिरिक्त सुमित नागल, शशिकुमार मुकुंद, डेव्हिस चषक संघातील खेळाडू रामकुमार रामनाथन, युकी भांब्री आणि साकेत मायनेनी यांचा समावेश आहे.
महिला संघाचे नेतृत्व मागील आशियाई खेळांत एकेरीत कांस्यपदक जिंकलेली खेळाडू अंकिता रैना करणार आहे. ‘एआयटीए’ने जारी केलेल्या निवेदनानुसार, करमन कौर थांडी, ऋतुजा भोसले, सहजा यमलापल्ली, वैदेही चौधरी आणि प्रार्थना ठोंबरे या संघाच्या अन्य सदस्य आहेत. जकार्ता येथे 2018 साली झालेल्या आशियाई खेळांत भारताने एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदके जिंकली होती. तेथे बोपण्णा-दिविज शरण जोडीने कझाकस्तानच्या अलेक्झांडर बुबलिक आणि डेनिस येवसेयेव यांना पराभूत करून दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते. तर पुऊष एकेरीत प्रज्नेश गुणेश्वरनने कांस्यपदक पटकावले होते.
भारताचा माजी खेळाडू रोहित राजपाल याच्याकडे आशियाई खेळांत सहभागी होणाऱ्या चमूचे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर अंकिता भांब्री महिला संघाची कर्णधार असेल. अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या व्यावसायिक निवड समितीचे अध्यक्ष नंदन बाळ यांनी समिती सदस्य आणि संघांच्या कर्णधारांच्या सूचनांचा विचार करून वरील खेळाडूंच्या नावांची शिफारस केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.









