वृत्तसंस्था / पर्थ
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे बुधवारी यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट संघातील तिसरा आणि शेवटचा सामना खेळविला जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिले दोन सामने गमविले असल्याने आता हरमनप्रित कौरचा भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8.30 वाजता प्रारंभ होईल.
2025 साली भारतामध्ये आयसीसीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी या दोन संघातील हा शेवटचा वनडे सामना आहे. आतापर्यंत सातवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताचा दणदणीत पराभव केला. भारतीय संघातील खेळाडू पूर्णपणे निस्तेज झाल्याचे दिसून येते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करण्यासाठी झगडत आहेत. कर्णधार कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण सध्या या दोघी बॅडपॅचमधून जात आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या या वनडे मालिकेत मानधनाने केवळ 8 आणि 9 अशा धावा दोन सामन्यांत केल्या होत्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये भारतीय महिला संघाने मायदेशात न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला होता. या मालिकेत मानधनाने शतक झळकविले होते. तिने या मालिकेत 400 पेक्षा अधिक धावा जमविल्या होत्या. पण त्यानंतर तिने पुन्हा आपला फॉर्म गमविला आहे.
ताहिला मॅग्राच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन महिला संघाने नियमीत कर्णधार अॅलिसा हिलीची उणिव भासू दिली नाही. आता ऑस्ट्रेलियन संघामध्ये नवोदित फलंदाज जॉर्जीया व्हॉल हिने हिलीच्या गैरहजेरीत सलामीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत व्हॉलने पहिल्या सामन्यात नाबाद 46 तर दुसऱ्या सामन्यात शतक झळकविले. भारतीय संघाला फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करणे जरुरीचे आहे. मात्र बुधवारच्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिला संघ एकतर्फी पराभव टाळण्यासाठी शिकस्त करेल.









