वृत्तसंस्था/हाँगझाऊ
येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली असून आता या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकण्याचा नवा इतिहास नोंदवला आहे. या स्पर्धेचे दोन दिवस बाकी असून भारताने गुरुवारअखेर 18 सुवर्ण, 23 रौप्य आणि 39 कांस्यपदकांसह 80 पदकांची लयलूट केली आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवसापर्यंत भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील दोन दिवस बाकी असून प्रत्येक चार वर्षांनी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये भारतीय पथक पदकांचे शतक निश्चित ओलांडेल असे वाटते. 2018 च्या जकार्ता पॅरा आशियाई स्पर्धेत भारताने 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य अशी एकूण 72 पदके पटकावली होती.
चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी सचिन सर्जेराव खिलारी पुरुषांच्या एफ46 गोळाफेकमध्ये नव्या स्पर्धाविक्रमासह भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले. त्याने 16.03 मी. गोळाफेक केली तर रोहित कुमारने 14.56 मी. गोळाफेक करीत कांस्य मिळविले. भारताचा नेमबाज सिद्धार्थ बाबूने पुरुषांच्या आर 6 मिश्र 50 मी. रायफल प्रोन एसएच 1 प्रकारात 247.7 गुणासह सुवर्णपदक मिळवले. त्याचप्रमाणे भारताचे नेमबाज शितलदेवी आणि राकेशकुमार यांनी मिश्र सांघिक तिरंदाजी कंपाऊंड प्रकारात चीनच्या युसेन आणि झिनलियांग यांचा 151-149 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक मिळवले. पुरुषांच्या दुहेरीत डब्ल्यू 1 तिरंदाजी प्रकारात आदिल मोहमद नझीर अन्सारी आणि नवीन दलाल यांनी भारताला कास्यपदक मिळवून देताना कझाकस्तानच्या नूरशेत व सेगादात यांचा 125-120 असा पराभव केला. महिलांच्या टी-12 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या सिमरनने रौप्यपदक, महिलांच्या एफ 34 गोळाफेक प्रकारात भाग्यश्री जाधवने रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या टी-35 100 मी. शर्यतीमध्ये नारायण ठाकुरने 14.37 सेकंदाचा अवधी घेत कास्यपदक तर पुरुषांच्या टी-37 100 मी. धावण्याच्या शर्यतीत एस. त्रिवेदीने कास्यपदक मिळवले. पॅरा बॅडमिंटन प्रकारात सुकांत कदमने पुरुषांच्या एकेरीत एसएल 4, एस. एन. सुमतीने महिला एकेरीत, मनीषा रामदासने महिलांच्या एसयु 5 एकेरीमध्ये, मनदीप कौर आणि मनीषा रामदास यांनी महिला दुहेरीत कांस्य मिळविले.









