वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून पहिल्या दोन सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी बीसीसीआयच्या निवड समितीने हा निर्णय घेतला.
भारतीय निवड समिती सदस्यांनी सध्या सूर मिळवण्यासाठी झगडत असलेल्या उपकर्णधार केएल राहुलवर पुन्हा आपला विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून राहुल सूर मिळवण्यासाठी झगडत असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीकरिता त्याचे संघातील स्थान कायम ठेवले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी इंदोरमध्ये 1 मार्चपासून तर चौथी आणि शेवटची कसोटी अहमदाबादमध्ये खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आले आहे. रोहितच्या गैरहजरीत वनडे संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या पहिल्या सामन्यात करणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा काही घरगुती समस्येमुळे खेळणार नाही. वनडे मालिकेतील पहिला सामना 17 मार्चला मुंबई, दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणम येथे तर तिसरा आणि शेवटचा वनडे सामना चेन्नईत 22 मार्चला होणार आहे.
भारतीय कसोटी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, पुजारा, कोहली, के. एस. भरत, इशान किसन, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहमद शमी, मोहमद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनादकट.
भारतीय वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किसन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, मोहमद शमी, मोहमद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकुर आणि जयदेव उनादकट.









