काल-परवा पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करत बांगलादेशला पॅकअप करण्यास भाग पाडले. दुसरीकडे तूर्तास तरी भारतीय संघ अव्वल स्थानी असून, उपांत्य फेरीचे स्थानही पक्कं केलं. फक्त औपचारिकता एवढीच आहे की भारत पॉइंट टेबलमध्ये एक नंबर की दोन नंबर. असो. भारताला अजून लीगमधील तीन सामने खेळायचे आहेत. प्रश्न हाच आहे की भारतीय संघ समोरचा संघ बघून 11 निवडणार की कुठलाही संघ आला तरी पूर्व नियोजित अकराचाच चमू मैदानात उतरवणार हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
गंमत बघा, भारतीय संघातील जवळपास सर्व खेळाडूंनी आपला चांगला परफॉर्मन्स दिला आहे. प्रश्न हाच आहे की हार्दिक पंड्या संघात आल्यानंतर श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यापैकी एकाला संघाबाहेर बसावं लागेल. परंतु तुम्ही मला जर विचारलंत या दोघांपैकी उजवा कोण? तर माझं झुकतं माप हे सूर्यकुमार यादवकडे असेल. पहिल्या सामन्यात दुर्दैवाने धावबाद झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या 49 धावा या लाख मोलाच्या. या धावांचं महत्त्व एखाद्या सामन्यातील द्विशतकापेक्षा कमी नव्हतं.
सूर्याबद्दल सांगायचं तर त्याचा पिंड हा टी-20 चा. सूर्यकुमारने मागील काही वर्षात बऱ्याच आयपीएल स्पर्धा गाजवल्या. त्यामुळेच की काय त्याला भारतासाठी टी-20 चा दरवाजा पटकन उघडला. आयपीएलमध्ये 2014 साली केकेआरकडून सलग चार वर्षे तो खेळला. तेथे त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्यानंतर मुंबईला मुंबईकर सूर्याची किंमत समजली.
टी-20 मध्ये रोहित, विराटनंतर खरी मदार ही सूर्यकुमार यादववरच असते. परंतु टी-20 क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये जमीन-आसमानाचा फरक. परंतु यामध्येही सूर्याने त्यात बाजी मारली. झटपट क्रिकेटमध्ये 360 डिग्रीवाला खेळाडू म्हणून त्याने त्याची ओळख जगाला दिली. त्याने या ओळखीत कमालीचे सातत्य ठेवले हे विशेष. त्याच्या भात्यात सर्व प्रकारचे फटके आहेत आणि गोलंदाज बघून तो फटक्यांची निवड करतो हे विशेष. टी-20 तर तो चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालाच आहे. आता त्याची खरी कसोटी झटपट क्रिकेट (50-50 षटकांचे सामने) मध्ये आहे. दस्तुरखुद्द विराट कोहलीही त्याची फलंदाजी बघून कमालीचा अचंबित होतो. भर मैदानात त्याने त्याला केलेला कुर्निसात आपल्याला आठवत्&ंच असेल.
सूर्यासारखा खेळाडू असणे म्हणजे कुठल्या संघासाठी मोठी अॅसेट. सूर्या हा असा फलंदाज आहे की कठीण परिस्थितीत संघाची नाव तो सहज पार करतो. आणि हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. झटपट क्रिकेटमध्ये तुमच्या तंत्राचा खरा कस लागतो. परंतु सूर्याच्या फलंदाजीत त्याच्या तंत्राला आक्रमकतेची जोड असते. आणि अर्थात ज्या पद्धतीने तो सध्या खेळत आहे ते पाहता तो निश्चितच यशस्वी होईल असेच एकंदरीत चित्र दिसतं. भारताचे तीन सामने शिल्लक आहेत, भारताला जर सूर्या उपांत्य फेरीत हवा असेल तर उर्वरित तीन सामन्यात त्याला संधी देणे गरजेचे आहे, किंबहुना मी तर असं म्हणेन त्याला वरच्या क्रमांकावर पाठवून (पिंच हिटर) त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. कारण चुकून महत्त्वाच्या सामन्यात (मस्ट विन गेम) आपली पडझड झाली तर सूर्या निश्चितच संघाला सावरू शकतो हे त्याने कित्येकदा दाखवून दिले आहे. भारताला जर विश्व विजेतेपदावर ठसा उमटवायचा असेल तर सूर्यासारखा खेळाडू 11 मध्ये असणे गरजेचे आहे. उपांत्य फेरीत अचानक घेण्यापेक्षा उर्वरित तीन सामन्यात टीम मॅनेजमेंटने सूर्यावर विश्वास दाखवलाच पाहिजे. सर्वसाधारण उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा उगवता सूर्य आहे हे सत्य नाकारून चालणार नाही. बघू, भारतीय संघ कुठली रणनीती आखतो. सूर्यकुमार यादव ‘स्काय’ या टोपण नावाने ओळखला जातो. तो आता अशा वळणावर येऊन थांबला आहे जिथे त्याला मागे बघणं कदाचित धोकादायक वाटू शकेल. येणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात जर सूर्या चमकला तर स्काय हे जे त्याचे टोपण नाव आहे ते तो खऱ्या अर्थाने सार्थ करू शकेल.
क्रिकेट समालोचक विजय बागायतकर









