वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बिजिंगमध्ये 17 ते 25 जून दरम्यान होणाऱ्या 2025 पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेत 16 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी होणार आहे. यामध्ये 7 महिलांचा समावेश आहे. येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित समारंभात पॅरा-स्पोर्टिंग समुदायातील मान्यवर आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत संघाला भव्य निरोप देण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आयआरएस, पीआर अतिरिक्त महासंचालक रणजित कुमार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या समारंभाला अखिल भारतीय पॅराऑलिम्पिक समितीच्या माजी अध्यक्षा दीपा मलिक, विद्यमान सरचिटणीस जयवंत हमण्णावर तसेच अखिल भारतीय पॅरा पॉवरलिफ्टिंग संघटेनेचे चेअरमन जे. पी. सिंग उपस्थित होते. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील कारण ते त्यांची गती कायम ठेवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मजबूत ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतील. भारतीय पथक बीजिंगच्या प्रवासाला निघाल्याने, देश या खेळाडूंच्या मागे खंबीरपणे उभा आहे, असे जेपी सिंग म्हणाले. भारतीय संघामध्ये झैनाब खातून, सीमा राणी, झंडू कुमार, जॉबी मॅथ्यू, मनिष कुमार, कस्तुरी यांचा समावेश आहे. या स्पर्धकांनी अलिकडेच झालेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली होती.









