मुकेश कुमार, जडेजा, सिराजकडून भेदक गोलंदाजी, ब्रेथवेटचे अर्धशतक
वृत्तसंस्था / पोर्ट ऑफ स्पेन
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि मोहमद सिराज यांनी आपल्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाची विजयाची आशा जीवंत ठेवली आहे. या सामन्यातील खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजने शेवटची बातमी हाती आली त्यावेळी पहिल्या डावात 7 बाद 239 धावा जमवल्या होत्या. कर्णधार क्रेग ब्रेथवेटने शानदार अर्धशतक झळकविले.

या कसोटीमध्ये भारताने पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर विंडीजने पहिल्या कसोटीच्या तुलनेत या दुसऱ्या सामन्यात चिवट फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार ब्रेथवेटने शानदार अर्धशतक झळकविताना 235 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 75 धावा जमवल्या. त्याला चंद्रपॉलने बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. चंद्रपॉल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मॅकेन्झीने ब्रेथवेटसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 46 धावांची भर घातली. मॅकेन्झीने 57 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 32 तर चंद्रपॉलने 95 चेंडूत 4 चौकारांसह 33 धावा जमवल्या. क्रेग ब्रेथवेट चौथ्या गड्याच्या रुपात बाद झाला. अश्विनच्या अधिक वळलेल्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात त्याचा त्रिफळा उडाला. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांची फिरकी गोलंदाजी विंडीजच्या फलंदाजांना चांगलीच पेचात टाकली होती. दरम्यान जुन्या चेंडूवर मोहमद सिराजचे चेंडू चांगलेच स्वींग होत होते पण त्याला अधिक बळी मिळू शकले नाहीत. जडेजाने चंद्रपॉलला बाद केल्यानंतर ब्लॅकवूडला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 2 चौकारांसह 20 धावा जमवल्या. विंडीजने शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत 3 बाद 174 धावापर्यंत मजल मारली होती. विंडीजचे द्विशतक 573 चेंडूत फलकावर लागले. सिराजने डिसिल्वाचा त्रिफळा उडवला. त्याने 10 धावा जमवल्या. विंडीजने 5 बाद 208 धावा जमवल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने सुमारे 15 ते 20 मिनिटे खेळ थांबवावा लागला. पंचांनी पुन्हा खेळाला सुरू केल्यानंतर भारताने दुसरा नवा चेंडू घेतला. विंडीजने 108 षटकात 5 बाद 229 धावा जमवल्या असताना अंधुक प्रकाशामुळे पंचांनी तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्याची घोषणा केली. अॅथेन्झ 37 तर होल्डर 11 धावावर खेळत होते.
भारतीय कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मुकेशकुमारने मॅकेन्झीला यष्टीरक्षक इशान किसनकरवी झेलबाद करून आपला पहिला बळी नोंदवला. त्यानंतर त्याने रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ झाल्यानंतर अॅथेन्झला पायचित केले. अॅथेन्झने 115 चेंडूत 3 चौकारांसह 37 धावा जमवल्या. सिराजने होल्डरला यष्टीरक्षककरवी झेलबाद केल्याने विंडीजची स्थिती 7 बाद 233 अशी झाली होती. होल्डरने 2 चौकारांसह 15 धावा जमवल्या. या कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवशी पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 67 षटकांचा खेळ झाला होता त्यामुळे पंचांनी रविवारी चौथ्या दिवशाच्या खेळाला निर्धारित वेळेपूर्वी सुरुवात केली. विंडीजचा संघ शनिवारी नकारात्मक फलंदाजी करत ही कसोटी अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. विंडीजचा संघ अद्याप 199 धावांनी पिछाडीवर आहे. भारतातर्फे सिराज, जडेजा आणि नवोदित मुकेशकुमार यांनी प्रत्येकी दोन तर अश्विनने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : भारत प. डाव 128 षटकात सर्वबाद 438, विंडीज प. डाव 110.1 षटकात 7 बाद 239 (क्रेग ब्रेथवेट 1 षटकार आणि 5 चौकारासह 75, टी. चंद्रपॉल 4 चौकारांसह 33, मॅकेन्झी 1 षटकार, 4 चौकारासह 32, ब्लॅकवूड 2 चौकारासह 20, अॅथेन्झ 3 चौकारासह 37, डिसिल्वा 10, होल्डर 2 चौकारासह 15, अवांतर 17, मोहमद सिराज 2-52, जडेजा 2-37, मुकेशकुमार 2-41, अश्विन 1-61).









