आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात आर. अश्विनची दुसऱया स्थानी झेप
वृत्तसंस्था/ दुबई
बुधवारी भारताने आयसीसी कसोटी संघांच्या मानांकनात पहिले स्थान मिळवित क्रिकेटच्या तीनही प्रकारात नंबर वन संघ बनला आहे तर कसोटी गोलंदाजांमध्ये रविचंद्रन अश्विनने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे.
नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव व 132 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या कामगिरीमुळे भारताचे मानांकनातील स्थान वधारले आणि ऑस्ट्रेलियाला मागे सारत त्यांनी पहिले स्थान मिळविले. टी-20 मध्ये भारतीय संघ अग्रस्थानावरच असून गेल्या महिन्यात न्यूझीलंडला 3-0 असे हरवून वनडे मानांकनातही भारताने अग्रस्थानी झेप घेतली होती. कसोटी मानांकनात भारताने (115) ऑस्ट्रेलियापेक्षा (111 रेटिंग गुण) चार रेटिंग गुण जादा मिळविले आहेत. शुक्रवारपासून दिल्लीत सुरू होणाऱया दुसऱया कसोटीत विजय मिळविल्यास भारताचे अग्रस्थान भक्कम होईलच. पण सलग दुसऱयांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधीही आणखी भक्कम होईल. चार कसोटीची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका भारताला 3-1 किंवा 3-0 अशा फरकाने जिंकण्याची गरज आहे. तसे झाल्यास भारताची डब्ल्यूटीसी अंतिम फेरी निश्चित होईल.

अश्विनची झेप
खेळाडूंच्या मानांकनात गोलंदाजीमध्ये ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. नागपूर कसोटीत केलेली 8 बळी मिळविण्याची कामगिरी यासाठी त्याला उपयुक्त ठरली. डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजा 16 व्या स्थानावर पोहोचला असून त्याने नागपूर कसोटीत गोलंदाजी व फलंदाजी दोन्हीत चांगली कामगिरी केली. त्यात तो सामनावीराचा मानकरीही ठरला होता. गुडघ्याच्या दुखापतीनंतर सहा महिने विश्रांती घेतल्यानंतर त्याने या कसोटीत पुनरागमन केले होते. अश्विन व जडेजा यांच्या भेदक फिरकीने पहिल्या कसोटीत 15 मिळविले होते. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया डावात 37 धावांत 5 बळी मिळवित तिसऱया दिवशीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणत विजय मिळवून दिला. पहिल्या डावात त्याने 42 धावांत 3 बळी मिळविले होते.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अग्रस्थानावर असून अश्विन त्याच्यापेक्षा केवळ 21 रेटिंग गुणांनी मागे आहे. त्यामुळे या मालिकेत अश्विनला अग्रस्थानावर झेप घेण्याची संधी आहे. तसे झाल्यास 2017 नंतर तो प्रथमच अग्रस्थानावर असेल. पहिल्या कसोटीत जडेजाने पहिल्या डावात 5 व दुसऱया डावात 2 बळी मिळविल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसऱया डावात केवळ 91 धावांत धुव्वा उडाला. भारताच्या अन्य गोलंदाजांत दुखापतीमुळे गेल्या सप्टेंबरपासून क्रिकेटपासून दूर असलेला जसप्रित बुमराह पाचव्या स्थानावर आहे.
कसोटी फलंदाजांच्या मानांकनात कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यामुळे दोन स्थानानी पुढे सरकला असून तो आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. रिषभ पंत अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे. पण टॉप टेनमध्ये सामील असणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. तो या क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर व उस्मान ख्वाजा यांना मात्र स्वस्तात बाद होणे महाग पडले आहे. वॉर्नरची सहा स्थानांनी घसरण होऊन 20 व्या तर ख्वाजाची दोन स्थानांनी घसरण होऊन 10 व्या स्थानावर विसावला आहे. मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ या क्रमवारीत पहिल्या दोन क्रमांकावर असून पाकचा बाबर आझम तिसऱया स्थानावर आहे. अष्टपैलूंमध्ये अक्षर पटेलने सहा स्थानांची बढती मिळवित सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पहिल्या कसोटीत 84 धावांचे योगदान दिले होते.









