वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्ती फेडरेशनचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी अॅडहॉक समितीने क्रोएशियातील झाग्रेब येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा केली.
क्रोएशियात होणारी ही पहिली विश्व मानांकन कुस्ती स्पर्धा 10 ते 14 जानेवारी या कालावधीत होणार आहे. अॅडहॉक समितीमध्ये भूपिंदर सिंग बजवा हे अध्यक्षपदी आहेत. ‘परराष्ट्र मंत्रालयाने वेळीच लक्ष घातल्यामुळे झाग्रेबला जाणाऱ्या 25 जणांची व्हिसाची औपचारिकता पूर्ण करता आली, असे बजवा म्हणाले. व्हिसा मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. पण परराष्ट्र मंत्रालयाने मदत केल्याने ही समस्या दूर झाली असून खेळाडू आता क्रोएशियाला प्रयाण करू शकतात,’ असेही ते म्हणाले.
क्रोएशियन कुस्ती फेरडेशनचे सरचिटणीस टिन ब्रेगोविच यांनी 13 मल्ल, नऊ कोचिंग व सपोर्ट स्टाफ आणि 3 रेफरींना पाठवण्यास भारताला सांगितले होते. या स्पर्धेसाठी आपला संघ नियोजित वेळेत पोहोचेल याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. या स्पर्धेत खेळणारे 13 मल्ल या संधीचा लाभ घेत एप्रिलमध्ये होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेची तसेच मेमध्ये होणाऱ्या विश्व पात्रता स्पर्धेची चांगली तयारी करतील, अशी आशा वाटते, असेही बजवा म्हणाले.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले मल्ल : पुरुष फ्रीस्टाईल-अमन, यश, दीपक पुनिया, विकी, सुमित. ग्रीको-रोमन-ज्ञानेंदर, नीरज, विकास, सुनील कुमार, नरिंदर चीमा, नवीन. महिला : सोनम, राधिका. कोचिंग व सपोर्ट स्टाफ : कुलदीप सिंग (टीम लीडर व कोच), विनोद कुमार, सुजीत, शशी भूषण प्रसाद, मनोज कुमार, वीरेंदर सिंग, अलका तोमर (प्रशिक्षक), विशाल कुमार राय (फिजिओ), नीरज (मसाजर). रेफरी : सत्यदेव मलिक, दिनेश धेंडिबा गुंड, संजय कुमार.









