वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे होणाऱ्या पंचरंगी हॉकी स्पर्धेसाठी प्रमुख ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंगची कर्णधारपदी निवड करण्यात आली असून यासाठी 24 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. 15 ते 22 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
या संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असून सुमित व अमित रोहिदास यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 2023-24 हॉकी प्रो लीग मोसमाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. या स्पर्धेत भारताच्या लढती स्पेन, जर्मनी, फ्रान्स व बेल्जियम यांच्याविरुद्ध होणार आहेत. गोलरक्षण विभागात सुरज करकेराचे पुनरागमन झाले असून पीआर श्रीजेश व कृशन बी. पाठक हे प्रमुख गोलरक्षक आहेत. बचावफळीत हरमनप्रीत नेतृत्व करणार असून त्याच्यासोबत जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, रोहिदास, वरुण कुमार, सुमित, संजय व निलम संजीप झेस हेही बचावफळीत असतील.
जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळताना येणाऱ्या दबावाचा अनुभव या स्पर्धेत खेळताना युवा खेळाडूंना मिळणार आहे. आपला संघ समतोल असून युवा व अनुभवी खेळाडूंचे त्यात योग्य मिश्रण आहे. या स्पर्धेत आम्हाला अनेक गोष्टी आजमावून पाहण्याची व त्यानुसार अॅडजस्ट करून घेण्याची संधी मिळणार आहे, असे प्रमुख प्रशिक्षक व्रेग फुल्टन म्हणाले. पुढील सात महिने आमच्यासाठी महत्त्वाचे असून ऑलिम्पिकआधी आम्हाला भरपूर सामने खेळावयास मिळणार आहेत. प्रक्रियेनुसार आणि पायरीपायरीने त्याचा पाठपुरावा करणे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते म्हणाले.
पंचरंगी हॉकी स्पर्धेसाठी निवडलेले खेळाडू : गोलरक्षक-पीआर श्रीजेश, कृशन बहादूर पाठक, सुरज करकेरा. बचावफळी-जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, सुमित, संजय, निलम संजीप झेस. मध्यफळी-यशदीप सिवाच, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, शमशेर सिंग, रबिचंद्र सिंग मोइरंगथेम. आघाडी फळी-मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, कार्ती सेल्वम, दिलप्रीत सिंग, आकाशदीप सिंग.









