वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
या महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चौरंगी हॉकी स्पर्धेसाठी भारताने 26 सदस्यीय जंबो संघाची निवड केली आहे. या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने त्याआधी अनेक खेळाडूंना आजमावून पाहिले जाणार आहे. त्यामुळे हे जंबो पथक निवडण्यात आले आहे.
ही स्पर्धा केपटाऊनमध्ये 22 जानेवारीपासून सुरू होणार असून माजी कर्णधार मनप्रीत सिंगचे ब्रेकनंतर पुनरागमन होत आहेत. भारताशिवाय या स्पर्धेत फ्रान्स, नेदरलँड्स व यजमान दक्षिण आफ्रिका या संघांचा सहभाग आहे. या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे असून वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा एफआयएचचा पुरस्कार मिळविणारा हार्दिक सिंग उपकर्णधारपदी असेल.
‘या ऑलिम्पिक वर्षात आम्हाला दक्षिण आफ्रिका दौरा करण्यास मिळतोय, यामुळे आम्ही रोमांचित झालो आहोत. या चौरंगी स्पर्धेत दर्जेदार संघांविरुद्ध खेळण्याची व आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे,’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले. ‘जास्तीत जास्त खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, यासाठी आम्ही मोठे पथक निवडले आहे. याशिवाय प्रो लीग स्पर्धेआधी प्रत्यक्ष स्पर्धेत ते कसे खेळतात हे पाहण्याची संधीही मला मिळणार आहे’, असेही ते म्हणाले.
युवा खेळाडू अरैजीत सिंग हुंदाल व बॉबी सिंग धामी यांनी कनिष्ठ संघातून खेळताना प्र्रभावी कामगिरी केली होती. त्याची दखल घेत या दोघांनाही संघात सामील करण्यात आले आहे. ‘बेंगळूरमधील साइ केंद्रात प्रयाण करण्याआधी या संघाचे छोटे शिबिर घेण्यात येणार आहे. या वरिष्ठ संघात दोन ज्युनियर गटातील युवा खेळाडूंना स्थान दिले असून या स्तरावर खेळताना ते कसे जुळवून घेतात ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे,’ असेही ते म्हणाले. अनुभवी खेळाडू पीआर श्रीजेश व कृशन बहादुर पाठक या गोलरक्षकांची निवडही करण्यात आली आहे.
चौरंगी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले हॉकीपटू : गोलरक्षक-पीआर श्रीजेश, केबी पाठक, पवन. बचावपटू-जर्मनप्रीत सिंग, जुगराज सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, सुमित, संजय, रविचंद्र सिंग मोइरंगथेम. मध्यफळी-विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, राजकुमार पाल, शमशेर सिंग, विष्णुकांत सिंग, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग. आघाडी फळी-मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, गुर्जंत सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, अरैजीत सिंग हुंदाल, बॉबी सिंग धामी.









