वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बँकॉकमध्ये होणाऱ्या 19 आणि 22 वर्षांखालील आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी भारताने 40 सदस्यांचा संघ जाहिर केला आहे. 26 देशांतील 396 बॉक्सर्सचा सहभाग असणारी ही स्पर्धा आशियाई बॉक्सिंग, वर्ल्ड बॉक्सिंग आणि थायलंड बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
यामध्ये 19 वर्षांखालील (2007 ते 2008 दरम्यान जन्मलेले) आणि 22 वर्षांखालील (2004 ते 2006 दरम्यान जन्मलेले) असे दोन वयोगटातील खेळाडू सहभागी होतील आणि ऑलिम्पिक शैलीतील बॉक्सिंग नियमांनुसार पुरुष आणि महिला दोन्ही संघ स्पर्धा करतील. भारतीय संघात दोन्ही विभागांत प्रतिभेचे उत्तम मिश्रण आहे. तीन वेळा आशियाई चॅम्पियन आणि दोन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन विश्वनाथ सुरेश हे या संघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय चॅम्पियनशिप पदक विजेते सागर, प्रीत मलिक आणि खेलो इंडिया सुवर्णपदक विजेती सुमन कुमारी हे आहेत.









