वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणाऱया आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी पुरुष आणि महिलांचा सहभाग असलेला भारतीय मुष्टियुद्ध संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये प्रामुख्याने अनुभवी शिवा थापा आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेन यांचा समावेश आहे.
आशिया खंडामध्ये होणारी ही आगामी स्पर्धा जॉर्डनच्या अम्मान येथे आयोजित केली आहे. सदर स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान घेतली जाईल. पतियाळाच्या एन.आय.एस. केंद्रामध्ये येत्या गुरुवारपासून तीन दिवसांच्या कालावधीमध्ये निवड चाचणी घेतली जाणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेत विद्यमान विश्वविजेती निखत झरीन, तीनवेळा आशियाई पदकविजेता अमित पांघल तसेच बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकविजेते मुष्टियोद्धे रोहित टोकास आणि सागर अहलावत यांचा सहभाग राहणार नाही. त्यांना निवड चाचणी स्पर्धेतून वगळले आहे. निखत झरीनला विश्रांतीची जरुरी असल्याने ती निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. तर अमित पांघल, टोकास आणि अहलावत यांना झालेल्या दुखापती अद्याप पूर्णपणे बऱया झालेल्या नाहीत. त्यामुळे हे स्पर्धक निवड चाचणीमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्टीकरण अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिले.
भारताचा आघाडीचा मुष्टियोद्धा शिवा थापाने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक मुष्टियुद्ध कारकीर्दीत पाचवेळा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पदके मिळविली आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदके घेतली आहेत. गेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत थापाने रौप्यपदक मिळविले होते. पुरुषांच्या विभागात 57 किलो वजन गटात भारताचा मुष्टियोद्धा मोहम्मद हुसामुद्दीन याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. त्याने दोनवेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक घेतले आहे. 24 वषीय बोर्गोहेनने गेल्या आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. लवलिना बोर्गोहेन आता 75 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. पुढील वषी होणाऱया पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बोर्गोहेनने आतापासूनच आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे.
महिलांच्या विभागात 63 किलो गटात परवीन हुडा तसेच युवा विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेतील चॅम्पियन अलफिया पठाण यांचाही समावेश राहील. भारतीय पुरुष आणि महिला मुष्टियुद्ध संघ ऑक्टोबरच्या मध्यंतरी अम्मानला रवाना होईल. या आगामी स्पर्धेपूर्वी भारतीय मुष्टियुद्ध संघासाठी पंधरा दिवसांचे सराव शिबिर आयोजित केले आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघ- पुरुष- गोविंद सहानी (48 किलो), स्पर्श कुमार (51 किलो), सचिन (54 किलो), मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो), इताश खान (60 किलो), शिवा थापा (63.5 किलो), अमित कुमार (67 किलो), सचिन (71 किलो), सुमित (75 किलो), सी. लक्ष्य (80 किलो), पी. कपिल (86 किलो), के. नवीन (92 किलो), नरेंद्र (92 किलोवरील).
महिला- मोनिका (57 किलो), सविता (50 किलो), मीनाक्षी (52 किलो), साक्षी (54 किलो), प्रीती (57 किलो), सिमरनजित (60 किलो), परवीन (63 किलो), अंकुशिता बोरो (66 किलो), पूजा (70 किलो), लवलिना बोर्गोहेनने (75 किलो), सवीती (81 किलो) आणि अलफिया (81 किलोवरील गट).









