वृत्तसंस्था/ हाँगझोऊ (चीन)
येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पथक पुन्हा एकदा विक्रमी पदके मिळविण्यासाठी सज्ज झाले आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे सर्वात मोठे पथक दाखल झाले आहे.
भारताची महिला नेमबाज अवनी हिने टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदक मिळविले होते. तर अँटिलने पुरूषांच्या भालाफेक प्रकारात सुवर्णपदक घेतले होते. रविवारपासून येथे आशियाई क्रीडा स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ होणार असून ही स्पर्धा 28 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. भारताचा आणखी एक नेमबाज मनिष नरवाल तसेच बॅडमिंटनपटू प्रमोद भगत व कृष्णा नागर यांनीही टोकीयो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली होती. रविवारपासून सुरु होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे 313 सदस्यांचे पथक दाखल झाले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 22 क्रीडा प्रकारांचा समावेश असून त्यापैकी 17 क्रीडा प्रकारात भारताचे स्पर्धक आपला सहभाग दर्शवतील. रोईंग, कॅनोईंग, लॉनबॉल, तायक्वांदो आणि ब्लाइंड फुटबॉल या क्रीडा प्रकारात भारताचे स्पर्धक प्रथमच भाग घेत आहेत. या स्पर्धेमध्ये 43 देशांचे सुमारे 4 हजार खेळाडू दाखल झाले आहेत. 22 क्रीडा प्रकारांसाठी एकूण 566 सुवर्णपदके ठेवण्यात आली आहेत. सदर पॅरा आशियाई स्पर्धा 9 ते 15 ऑक्टोबर 2022 साली घेण्याचे ठरले होते. पण कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली. प्रत्येक पॅरा आशियाई स्पर्धेत चीनने पदक तक्त्यात आघाडी मिळविली आहे. यावेळी चीनने 439 सदस्यांचे पथक सज्ज ठेवले आहे. 2010 साली ग्युयांगझोयु (चीन) येथे पहिली पॅरा आशियाई स्पर्धा झाली होती. त्यामध्ये भारताने 14 पदकांसह 15 वे स्थान मिळविले होते. यजमान चीनने 218 साली झालेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत 172 सुवर्णांसह 319 पदके मिळविली होती. 2014 आणि 2018 च्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताने पदक तक्त्यात अनुक्रमे 15 वे आणि 9 वे स्थान मिळविले होते.









