वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनची राजधानी लंडन येथे एका भारतीय विद्यार्थिनीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तिचे नाव कोन्थाम तेजस्विनी असे असून ती मूळची हैदराबादची होती. तिचे वय 27 वर्षे असून ती ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी आलेली होती. लंडनच्या वेंबले येथील एक भाड्याच्या घरात तिची मंगळवारी हत्या करण्यात आली. तिचा मारेकरी ब्राझीलचा नागरिक असल्याचे समजते.
तेजस्विनी तिच्या एका मैत्रिणीसह या घरात रहात होती. त्यांच्यासह आणखी एक ब्राझिलियन विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी या घराच्या दुसऱ्या भागात रहात होते. या दोघांनाही संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. तेजस्विनी हिची मैत्रिणही हल्ल्यात किरकोळ जखमी झाली आहे, अशी माहिती देण्यात आाली.
हल्लेखोराने चाकूने भोसकल्याने तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाला. तिच्यावर हल्ला होण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. ब्राझिलीयन विद्यार्थी आणि त्याच्यासोबत असणारी विद्यार्थिनी यांना अटक करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थिनीला नंतर सोडून देण्यात आले. ब्राझिलीयन विद्यार्थ्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे. याचसंदर्भात आणखी एका संशयितालाही अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
गेल्या मार्चमध्येच…
तेजस्विनी ही गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये मास्टर्स डिग्री घेण्यासाठी लंडन येथे स्थलांतरित झाली होती. तिच्या हत्येचे वृत्त हैदराबाद येथील तिच्या मातापित्यांना कळविण्यात आले असून त्यांना प्रचंड धक्का बसला आहे. ते लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. लंडनमधील भारतीय समाज या घटनेने हादरला असून तेथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षेची चिंता वाटत आहे. ब्रिटीश पोलीस या विद्यार्थ्यांना धीर देत असून त्यांनी सुरक्षेची भक्कम व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे.









