जिममध्ये झाला होता हल्ला
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेच्या इंडियाना प्रांतातील एका फिटनेस सेंटरमध्ये 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर चाकूने वार करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीयाचा मृत्यू झाला आहे. ज्या विद्यापीठात हा विद्यार्थी शिकत होता, त्यानेच यासंबंधी माहिती दिली आहे. क्लपरासियो विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या वरुण राजवर 29 ऑक्टोबर रोजी एका जिममध्ये जॉर्डन एंड्राडने चाकूने हल्ला केला होता. या दु:खाच्या क्षणी आमच्या संवेदना वरुण याचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत असे विद्यापीठाने म्हटले आहे. तर वरुण राजच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विद्यापीठ सातत्याने वरुणच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. वरुणच्या कुटुंबीयांना यातून सावरता यावे म्हणून आम्ही शक्य तितकी मदत अन् समर्थन करत राहणार आहोत असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरात 16 नोव्हेंबर रोजी वरुणसाठी स्मृती सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. वरुणसोबत माझे कधीच संभाषण झाले नव्हते, तरीही अन्य एका इसमाने वरुण मला मारण्याची धमकी देत असल्याचे सांगितले होते असा दावा हल्लेखोर जॉर्डन एंड्राडने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर केला आहे.









