हमाससाठी प्रचार केल्याचा आरोप : इस्रायलला केला होता विरोध : भारतात परत पाठविले जाण्याची शक्यता
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी भारतीय विद्यार्थी बदर खान सूरीला वर्जीनियातून अटक केली आहे. अमेरिकेत हमासच्या समर्थनार्थ प्रचार केल्याचा आरोप सूरीवर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विदेश धोरणाला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सध्या कारवाई केली जात आहे. सूरीला देखील याच कारवाईच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. इस्रायलला विरोध करण्याचा आरोप देखील त्याच्यावर आहे. सूरी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत अमेरिकेच्या जॉर्जटाउन विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो सेंटर फॉर मुस्लीम-ख्रिश्चियन अंडरस्टॅडिंगमध्ये पोस्टडॉक्टोरल फैलोच्या स्वरुपात शिक्षण घेत आहे. सूरी सक्रीय स्वरुपात हमासचा प्रचार करत होता आणि सोशल मीडियावर ज्यूविरोधी भावनांना खतपाणी घालत होता, त्याला अमेरिकेतून निर्वासित केले जाऊ शकते, असे अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाच्या सहाय्यक सचिव ट्रिशिया मॅकलॉघलिन यांनी स्पष्ट केले.
भारतीय विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असलेली भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासनचा चालू महिन्यातच व्हिसा रद्द करण्यात आला होता. श्रीनिवासन ‘हिंसा-दहशतवादाला बळ पुरविणे’ आणि हमासचे समर्थन करणाऱ्या कारवायांमध्ये सामील होती असा आरोप अमेरिकेच्या गृहसुरक्षा विभागाने (डीएचएस) केला आहे. व्हिसा रद्द झाल्यामुळे रंजनीला अमेरिकेतून बाहेर पडावे लागले आहे. डीएचएसनुसार रंजनीला एफ-1 स्टुडंट व्हिसा अंतर्गत कोलंबिया विद्यापीठाच्या शहरी नियोजनमध्ये पीएचडी करण्यासाठी प्रवेश मिळाला होता. अमेरिकेच्या विदेश विभागाने 5 मार्च रोजी तिचा व्हिसा रद्द केला होता. यानंतर रंजनीने 11 मार्च रोजी अमेरिकेतून बाहेर पडण्याचे पाऊल उचलले होते. जर कुणी हिंसा आणि दहशतवादाचे समर्थन करत असेल तर त्याला अमेरिकेत वास्तव्य करण्याची अनुमती दिली जाऊ नये, असे डीएचएसच्या सचिव क्रिस्टी नोएम यांनी म्हटले आहे.
कोलंबिया विद्यापीठासाठीचा मदतनिधी रोखला
ट्रम्प प्रशासनाने मार्चच्या प्रारंभी कोलंबिया विद्यापीठाच्या विरोधात कठोर पाऊल उचलत 400 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 3300 कोटी रुपये) अनुदान रद्द केले होते. प्रशासनाने विद्यापीठावर ज्यू विद्यार्थ्यांचा होणारा छळ रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचा शिक्षण विभाग, आरोग्य आणि मानव सेवा विभाग, न्याय विभाग आणि सामान्य सेवा प्रशासनाचा जॉइंट टास्क फोर्स टू कॉम्बॅट अँटी-सेमिटिजमने ही कारवाई केली होती. ज्यू विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यास अपयशी ठरलेल्या आणि निदर्शनांना अनुमती देणाऱ्या विद्यापीठांना फेडरल ग्रँट (संघीय वित्तीय सहाय्य) न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोलंबिया विद्यापीठाच्या ज्युडिशियल बोर्डाने गाझावरून झालेल्या निदर्शनांदरम्यान हॅमिल्टन हॉलवर कब्जा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली आहे.
पॅलेस्टिनी विद्यार्थिनी, निदर्शकाला अटक
अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेस्ट बँकेची एक पॅलेस्टिनी विद्यार्थिनी लेका कोर्डियाला अटक केली आहे. लेका 2022 मध्ये व्हिसाची मुदत संपुष्टात आल्यावरही अमेरिकेत राहत होती. एप्रिल 2024 मध्ये कोलंबिया विद्यापीठात हमास समर्थक निदर्शनांमध्ये भाग घेतल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. याचबरोबर कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थी महमूद खलीलला अटक झाली आहे. खलीलवर इस्रायलविरोधी निदर्शनांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी खलीलला डिटेंशन सेंटरमध्ये पाठविले आहे. खलील हा पॅलेस्टिनी वंशीय असून तो अमेरिकेचा स्थायी रहिवासी देखील आहे.









