सेन्सेक्स 169 अंकांसह तेजीत, जागतिक सकारात्मक संकेताने दिलासा
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजारामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये चढउताराचा प्रवास दिसून आला. सरतेशेवटी दोन्ही बाजार वधारासह बंद होण्यामध्ये यशस्वी ठरले. जागतिक सकारात्मक संकेताचा लाभ बाजाराला उठवता आला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 169 अंकांनी अर्थात 0.29 टक्के इतका वाढत 59,500 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 44 अंकांनी अर्थात 0.25 टक्के वाढत 17,648 अंकांवर बंद झाला. बाजारामध्ये सोमवारी दिवसभरामध्ये चढउतार पाहायला मिळाला. बँकिंग, वित्तसंस्था आणि आयटी क्षेत्रातील समभागांनी बाजाराला आधार दिला. अदानी समूहातील काही समभागांनी तेजीसह बंद होण्यात यश मिळविले.शेअरबाजारात बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग जवळपास 2 ते 4.5 टक्के इतके वाढलेले पाहायला मिळाले. एनटीपीसी, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो आणि सन फार्मा यांचे समभाग देखील तेजीसह बंद झाले. तर दुसरीकडे पॉवरग्रीड कॉर्प, इंडसइंड बँक, एल अँड टी, टाटा स्टील, एचयुएल, आयटीसी आणि टाटा मोटर्स यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. क्षेत्राच्या निर्देशांकांवर नजर टाकली असता आयटी निर्देशांक 1 टक्का तर सार्वजनिक बँकांचा निर्देशांक 0.5 टक्के इतका वधारलेला पाहायला मिळाला. ऑटो, माध्यम, धातू, फार्मा, रिऍल्टी, तेल आणि वायु आणि एफएमसीजी क्षेत्रातील निर्देशांक मात्र घसरणीत राहिले होते. शेअरबाजारातील भांडवल मूल्य 1.07 लाख कोटी रुपयांनी घटून 268.58 लाख कोटी रुपयांवर आले होते. हिडेनबर्ग यांच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या समभागावर शुक्रवारी नकारात्मक परिणाम दिसला होता. सुरुवातीच्या सत्रामध्ये सोमवारी देखील काही कंपन्यांवर नकारात्मक परिणाम दिसून आला.
जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण
जागतिक बाजारांकडे पाहता आशियाई बाजारात मिश्र कल पाहायला मिळाला. आशियाई बाजारात निक्की, शांघाई कम्पोझिट यांचे निर्देशांक तेजीसह तर हँगसेंग, कोस्पी, जकार्ता कम्पोझिट यांचे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. दुसरीकडे अमेरिकेतील बाजारामध्ये तेजीचा माहौल होता. डोजोन्स 28 अंकांनी तर नॅसडॅक 109 अंकांनी वधारत व्यवहार करत होता. युरोपातील बाजारामध्ये काहीसा नकारात्मक कल पाहायला मिळाला.









