सेन्सेक्स 483 अंकांनी घसरला, अदानी पॉवर नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धासह कच्च्या तेलातील दरवाढीमुळे भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी दबावात बंद झालेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स निर्देशांक 483 अंकांनी घसरला होता. अदानी पॉवरचे समभाग सर्वाधिक 7 टक्के इतके नुकसानीत होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 483 अंकांनी घसरत 65512 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 141 अंकांनी घसरत 19512 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 27 कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. केवळ तीनच समभाग वधारासह बंद झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये एचसीएल टेक यांचे समभाग 1 टक्के मजबूत झाले होते तर यांना टीसीएस आणि हिंदुस्थान लिव्हर यांनी वधारासह साथ दिली.
बँक ऑफ महाराष्ट्र आणि अदानी पॉवरचे समभाग घसरणीत राहिले. विविध क्षेत्राच्या निर्देशांकाच्या कामगिरीवर नजर टाकली असता आयटी निर्देशांक सोडल्यास इतर सर्व 12 क्षेत्राचे निर्देशांक नुकसानीसह बंद झाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक आणि धातू व माध्यम निर्देशांक 2 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीत होता. आयटीआय लिमीटेडचा समभाग दुसरीकडे सर्वाधिक नफ्यात असताना दिसला. समभागाचा भाव सोमवारी 11 टक्के इतका उसळला. याचप्रमाणे ऑईल इंडियाचा समभाग 5 टक्के, फ्युचर लाईफस्टाईल फॅशनचा समभाग 3 टक्के मजबूत होत बंद झाला. यूको बँकेचे समभाग 6.48 टक्के, इंडियन ओव्हरसिज बँक 6.37 टक्के, हाथवे केबल 6.31 टक्के आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 6.30 टक्के घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये टाटा स्टिलचे समभाग 2.07 टक्क्यांनी घसरणीत होते. महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, एशियन पेंटस यांचे समभागही नुकसानीसह बंद झाले. इस्त्रायल-हमास यांच्या युद्धाचा परिणाम बाजारावर झाला.









