सेन्सेक्स 433 अंकांनी वधारत बंद ः आयटी समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आयटी, बँकांच्या समभागांनी सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी उत्तम तेजी मिळवून दिल्याचे दिसून आले. सलग तिसऱया सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारासह बंद होण्यात यशस्वी झाले.
जागतिक मिळत्या जुळत्या संकेताच्या जोरावर सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 433 अंकांनी वधारत 53,161 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 132 अंकांनी वधारत 15,832 अंकांवर बंद झाला. सोमवारी भारतीय शेअर बाजाराने सुरूवातीपासून तेजीचा सूर पकडला होता. सोबत आशियाई बाजारात खरेदीचा कल पाहायला मिळाला. मिळत्याजुळत्या जागतिक संकेताच्या जोरावर शेअर बाजार तेजीसह व्यवहार करत होता. एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकाने 700 अंकांची वाढ दर्शवली होती तर निफ्टी निर्देशांकाने 15,850 अंकांचा टप्पा पार केला होता. बाजारात सोमवारी चौफेर तेजी दिसून आली. बँक, वित्त आणि आयटी कंपन्यांचे समभाग चांगलेच वधारत बाजाराला उत्तम आधार देत होते. यामुळे बाजार अधिक मजबुती प्राप्त करुन वाटचाल करत होता. निफ्टीतील आयटी निर्देशांक जवळपास 2 टक्के इतका मजबुत दिसून आला तर दुसरीकडे बँक आणि वित्त निर्देशांक 1 टक्के तसेच धातू आणि रियल्टी निर्देशांकही 1 टक्के तेजी राखून होते. यासोबत ऑटो, फार्मा, एफएमसीजीसह इतरही निर्देशांक मजबुत दिसून आले. सेन्सेक्समध्ये एचसीएल टेक, विप्रो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, सन फार्मा आणि टीसीएस यांचे समभाग सर्वाधिक वधारल्याचे दिसले. निफ्टी ऑटो निर्देशांक मजबुतीत व्यवहार करत होता, ज्यात टाटा मोटर्स, बजाज ऑटो, मारुती, अशोक लेलँड, महिंद्रा आणि महिंद्रा त्याचप्रमाणे टीव्हीएस मोटर्स यांचे समभाग 2 टक्क्याहून अधिक वधारलेले पहायला मिळाले. जागतिक बाजारात पाहता अमेरिका, युरोप व आशियाई बाजार तेजी दर्शवत होते.









