सेन्सेक्स 709 अंकांनी वधारला : टाटा मोटर्स, इंडसइंड बँकेचे समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअरबाजार दमदार तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. टाटा मोटर्स, इंडसइंड बँक यांच्या समभागांच्या कामगिरीमुळे शेअरबाजार चांगली तेजी राखू शकला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 709 अंकांनी वधारत 61764 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 195 अंकांनी वधारत 18264 अंकांवर बंद झाला होता. निफ्टी निर्देशांकात टाटा मोटर्सचे समभाग सर्वाधिक 4.92 टक्के वाढीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले.
यासोबत शेअरबाजारात इंडसइंड बँकेचे समभाग 4.92 टक्के, बजाज फायनान्स 4.21 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग 3.32 टक्के तेजीसह बंद झाले होते. एनटीपीसी, एचसीएल टेक, महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यांचे समभागदेखील वाढीसह बंद झाले. दुसरीकडे सनफार्मा, लार्सन टुब्रो, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायजेस तसेच नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. स्मॉल आणि मिडकॅप निर्देशांकसुद्धा तेजीत पहायला मिळाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग तेजीसह आणि 3 समभाग घसरणीसह बंद झाले. चौथ्या तिमाहीच्या निकालामुळे टाटा मोटर्सचे समभाग शेअरबाजारात दमदार वधारलेले होते. पेटीएमचे समभाग देखील 5 टक्के वाढीसह 724 रुपयांवर व्यवहार करत होते. शुक्रवारी सेन्सेक्स 694 अंकांनी घसरत 61054 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीही 186 अंकांनी घसरुन 18069 अंकांवर बंद झाला होता.
जागतिक बाजारही तेजीत
जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतील डोव जोन्स आणि नॅसडॅक निर्देशांक दमदार तेजी दर्शवत व्यवहार करत होते. युरोपियन बाजारातही तेजी होती. आशियाई बाजारात हँगसेंग 247 अंकांनी तेजीत होता.









