सेन्सेक्समध्ये 216 अंकांची घसरण : ऑटो, बँकिंग समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक बाजारातील दबावासह ऑटो, बँकिंग क्षेत्रांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय शेअरबाजार सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी घसरणीसह बंद झाला होता.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 216 अंकांनी घसरत 63,168 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या घसरणीसह 18,755 अंकांवर बंद झाला होता. बजाजचे दोन्ही कंपन्यांचे समभाग सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 2.24 टक्के इतके तेजीत होते. यासोबत टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा व टायटन यांचे समभाग तेजीत होते. कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, एचयुएल, आयसीआयसीआय बँक भारती एअरटेल यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. 30 समभागांपैकी 20 कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. बँकिंग आणि ऑटो निर्देशांक अनुक्रमे 416 अंक, 176 अंकांनी घसरणीत राहिले होते. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 292.53 लाख कोटी रुपयांनी घटले आहे.
ऊर्जा, रियल्टी, बँकिंग कंपन्यांच्या समभागात विक्री दिसून आली. आयटी, फार्मा निर्देशांक सोमवारी तेजीसह बंद झाले. एफएमसीजी, धातू निर्देशांकात दबाव दिसून आला तर स्मॉलकॅप निर्देशांक तेजी दाखवत बंद झाला. जिंदाल स्टील व पॉवरचा समभाग 5 टक्के वाढीसह 574 रुपयांवर व्यवहार करत होता.
जागतिक बाजारात घसरण
भारतीय शेअर बाजार सुरुवातीच्या सत्रात तेजी राखून होता. पण नंतर मात्र जागतिक बाजारातील दबावाचा परिणाम होऊन भारतीय बाजारही अखेरच्या टप्प्यात घसरणीत राहिला. जागतिक बाजारात सोमवारी अमेरिका, युरोप व आशियाई बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. अमेरिकेतील डोव्ह जोन्स 108 अंकांनी तर नॅसडॅक निर्देशांक 93 अंकांनी नुकसानीत होता. आशियाई बाजारात निक्की सर्वाधिक 335 अंकांनी घसरणीत होता. यासोबत हँगसेंग (127 अंक), स्ट्रेटस टाइम्स (18 अंक), कोस्पी (16 अंक) आणि शांघाई कम्पोझीट निर्देशांक 17 अंकांनी घसरणीत होता.









