सेन्सेक्स 115 अंकांनी नुकसानीत : क्षेत्राचे निर्देशांक घसरणीत
वृत्तसंस्था / मुंबई
जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर सोमवारी दिसून आला. तिसऱ्या सत्रात सेन्सेक्स 115 अंकांनी घसरणीसह बंद झाला. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकांचीही सोमवारी निराशाजनक कामगिरी दिसून आली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 115 अंकांच्या घसरणीसह 66166 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकसुद्धा 19 अंकांनी घसरण नोंदवत 19731 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील आयटी, बँक, ऑटोसहीत जवळपास 10 क्षेत्रांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले. एमएमटीसीचे समभाग सर्वाधिक 13 टक्के वाढले होते तर अदानी पॉवरचे समभाग मात्र 4 टक्के घसरणीत होते. जागतिक बाजारांमध्ये घसरणीचा कल तसेच मध्य पूर्वेत वाढती चिंताजनक स्थिती व यापार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ या साऱ्याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दबाव टाकताना दिसला. 13 पैकी 10 निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले. आयटी, बँक, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, फायनान्स यांचे निर्देशांक घसरणीत होते. तर निफ्टी मिडकॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांनी मात्र वधारत बंद होण्यात समाधान मानले.
सेन्सेक्समधील 19 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले तर 11 समभाग तेजीसोबत बंद झाले. टाटा स्टीलचा समभाग 1.68 टक्के मजबूत होत बंद झाला. याप्रमाणेच जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, महिंद्रा आणि महिंद्रा, टायटन, एनटीपीसी यांचे समभाग तेजीसह बंद झाले. नेस्ले इंडियाचे समभाग 1.94 टक्के घसरणीसह बंद झाले. यांच्यासोबत टीसीएस, इंडसइंड बँक, एशियन पेंटस्, सन फार्मा यांचे समभाग 1 टक्केपेक्षा जास्त नुकसानीत होते.
निफ्टी निर्देशांक सकाळी 19737 अंकांवर खुला झाला होता. 19,781 अंकांची उंचीही निर्देशांकाने इंट्रा डे दरम्यान गाठली होती. तर सेन्सेक्स 66,238 अंकांवर खुला झाला व 66,342 अंकांपर्यंत वर चढला होता. बाजारात मारुती, टाटा मोटर्स, कोल इंडिया, फेडरल बँक, लुपिन आणि श्री सिमेंट यांनी 52 आठवड्यानंतर इंट्रा डे दरम्यान बीएसईवर उच्चांकी स्तर गाठला होता. इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या भावावर दबाव होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 1 पैशांनी घटून 83.28 वर बंद झाला. निफ्टीतील 22 समभाग तेजीसोबत बंद झाले तर 27 घसरणीसह बंद झाले.









