सेन्सेक्स 241 अंकांनी नुकसानीत : बँकिंग निर्देशांक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. सेन्सेक्स 241 अंकांच्या घसरणीसह बंद झाला असून सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 समभागात तेजी दिसून आली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 241 अंकांनी घसरत 67,596 अंकांवर बंद झाला. या तुलनेमध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी घसरून 20133 अंकांवर बंद होताना दिसला. सोमवारच्या सत्रामध्ये बँकिंग क्षेत्रातील इंडियन ओवरसिज बँकेचा समभाग सर्वाधिक 15 टक्के इतका वाढलेला दिसला तर दुसरीकडे रेमंड यांचे समभाग हे घसरणीत दिसून आले. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 14 समभागांमध्ये घसरणीचा अनुभव पाहायला मिळाला. दुसरीकडे ज्युपिटर हॉस्पिटलचा समभाग 30 टक्के प्रीमियमसह बाजारात लिष्ट झाला. बीएसईवर हा समभाग 960 रुपयांवर लिस्ट झाल्याचे पाहायला मिळाले. या आधी सहा ते आठ दिवस सप्टेंबर या कालावधीमध्ये आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला होता, जो 63 पट इतका सबक्राईब झाला होता.
सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग एक टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीत राहिले होते याशिवाय कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, विप्रो, टेक महिंद्रा, जेएसडब्ल्यू स्टील, अॅक्सिस बँक, मारुती सुझुकी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभागही नुकसानीसह बंद झाले होते.
दुसरीकडे सेन्सेक्समधील पॉवरग्रीड कॉर्प, टायटन, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स आणि लार्सन टूब्रो यांचे समभाग तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले. सार्वजनिक बँकांचा निर्देशांक सोमवारी 3.5 टक्के इतका तेजीत असलेला पाहायला मिळाला तर दुसरीकडे ऊर्जा निर्देशांक व ऑटो निर्देशांक 1 टक्का आणि एफएमसीजी क्षेत्राचा निर्देशांक अर्धा टक्का इतका वाढताना दिसला. रियल्टी निर्देशांक मात्र एक टक्का इतका घसरणीत दिसून आला. बँक, आयटी, फार्मा आणि धातू निर्देशांक अर्धा टक्का इतके घसरले होते.
मागच्या आठवड्यामध्ये शेअर बाजाराने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांकाने 67,927 सर्वोच्च पातळी गाठली होती दुसरीकडे निफ्टी निर्देशांकदेखील 20222 अंकांच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला होता.









