सेन्सेक्समध्ये 237 अंकांची वाढ ः एचडीएफसी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी हे निर्देशांक तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाले. एचयुएल आणि एचडीएफसी या कंपन्या सर्वाधिक तेजीत राहिल्या होत्या.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 237 अंकांच्या वाढीसह 51,597.84 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 56 अंकांच्या तेजीसह 15,350.15 अंकांवर बंद झाला. आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाची शेअर बाजाराची सुरूवात तेजीने झाली होती. अखेरपर्यंत मात्र ही तेजी बाजाराला कायम टिकवता आली. जागतिक स्तरावरचा मिळताजुळता कल पाहून शेअर बाजाराचा कल तेजीकडे राहिला. सेन्सेक्स व निफ्टी हे दोन्ही निर्देशांक मजबुतीसह खुले झाले. सेन्सेक्समध्ये एकावेळी 200 अंकांची वाढ दिसली होती. सोमवारी शेअर बाजारात आयटी क्षेत्रातील समभागांची खरेदी अधिक दिसली तर निफ्टीत धातु निर्देशांक 5 टक्के घसरणीत होता. यात नाल्को, हिंडाल्को, सेल, टाटा स्टील, जिंदाल स्टील, जेएसएल यांच्या समभागांमध्ये 5 ते 8 टक्के इतकी घसरण दिसली. फार्मा, रिऍल्टी व एफएमसीजी क्षेत्राच्या निर्देशांकांनी मात्र तेजीकडे क्रम सुरू ठेवला आहे. सेन्सेक्सने एकावेळी 225 अंकांनी मजबूत होत 51,585 अंकांपर्यंत तर निफ्टीने 36 अंकांच्या वाढीसह 15,330 अंकांपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले. सनफार्मा, हिंदुस्थान युनिलीव्हर, डॉ. रेड्डिज लॅब्ज, विप्रो, टायटन आणि टीसीएस यांचे समभाग मात्र तेजीत दिसून आले. जागतिक संकेतामुळे आशियाई प्रमुख बाजारात घसरण दिसून आली. एलआयसीच्या समभागांनी सोमवारीही गुंतवणूकदारांना निराशच केल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी सुरुवातीच्या सत्रात एलआयसीचा समभाग सर्वात नीचांकी स्तर गाठत 650 रुपयांवर आला होता. पण नंतर या भावात काहीशी तेजी दिसली. सदरचा समभाग शुक्रवारी 655 रुपयांवर बंद झाला होता.
17 मे रोजी लिस्ट झाल्यानंतर कंपनीच्या बाजार भांडवलात सुमारे 30 टक्के इतकी घट झाली आहे.
सोमवारी बीएसईवर ऊर्जा कंपन्यांचे समभाग दबावाखाली 17 टक्के इतके खाली आले होते. मंगळूर रिफायनरीचे समभाग 17 टक्के घसरणीसह 78 रुपयांवर, चेन्नई पेट्रोलियमचे 15 टक्के घसरणीसह 277 रुपयांवर व्यवहार करत होते.