मुंबई :
सलग पाचव्या सत्रामध्ये भारतीय शेअर बाजार तेजीसमवेत बंद होण्यामध्ये यशस्वी झाला आहे. भारतीय शेअर बाजाराने ही कामगिरी दोन महिन्यानंतर नोंदवली आहे. सेन्सेक्स 213 अंकांनी तेजी दाखवत बंद झाला. आयटी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांमध्ये दमदार तेजी पाहायला मिळाली. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 213 अंकांनी वाढत 81,857 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक तर अंकांनी वाढत 25,050 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीसमवेत बंद झाले. यात टीसी एस, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि एनटीपीसी यांचे समभाग 4 टक्केपेक्षा अधिक तेजीसह कार्यरत होते. दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बजाज फायनान्स आणि टाटा मोटर्स यांचे समभाग मात्र दोन टक्क्यांपर्यंत घसरणीत राहिले होते.
निफ्टीमध्ये 50 पैकी 28 समभाग हे तेजीसोबत बंद झाले तर 22 समभाग घसरणीसह बंद झाले. निर्देशांकाची कामगिरी पाहता आयटी निर्देशांक 2.69 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 1.35 टक्के आणि रियल्टी 1.06 टक्के वाढीसह कार्यरत होता. दुसरीकडे माध्यम, बँकिंग आणि हेल्थकेअर निर्देशांक मात्र घसरणीत पाहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, रिलायन्स यांचे समभाग घसरणीत होते. निफ्टीमध्ये पाहता अॅक्सिस बँक, हिंडाल्को, लार्सन टूब्रो, मारुती सुझुकी, एसबीआय, ट्रेंट, एशियन पेंट्स, आयशर मोटर्स यांचे समभाग नुकसानीसोबत बंद झाले तर दुसरीकडे इटर्नल, टायटन, सन फार्मा, ग्रासिम, महिंद्रा आणि महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग तेजीमध्ये होते. बुधवारी संरक्षण आणि बिगरबँकिंग कंपन्यांचे समभाग दबावामध्ये होते. एफएमसीजीमध्ये पाहता इमामी 3.96 टक्के, कोलगेट 3.65 टक्के, ब्रिटानिया 3.67 टक्के, नेस्ले इंडिया 2.62 टक्के इतके तेजीत होते. हॉटेल संबंधित समभाग जसे की इंडियन हॉटेल, लेमन ट्री यांचे समभाग तेजीत होते. जुलै 24 नंतर निफ्टी पहिल्यांदाच 25 हजारच्या स्तरावर बंद झाला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ओला इलेक्ट्रिकच्या समभागाला 20 टक्के अप्पर सर्किट लागले होते. मिडकॅप निर्देशांक 266 अंकांनी तेजीत होता तर बँक निफ्टी निर्देशांक मात्र 167 अंकांनी घसरत 55,699 च्या स्तरावर बंद झाला. आशियाई बाजारात निक्केई आणि कोरियाचा कोस्पी घसरणीत बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंगसुद्धा घसरणीत होता.









