वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनुभवी मिडफिल्डर सुशीला चानू जखमी असल्याने महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (एसीटी) स्पर्धेसाठी तिला विश्रांती देण्यात आली असून या स्पर्धेसाठी 20 सदस्यीय संघाची घोषणा केली.
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुशीलाने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. गेल्या आठवड्यात संपलेल्या हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी कांस्यपदक मिळविले, त्या संघाचीही ती सदस्य होती. तिच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली असून डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर या दुखापतीचे स्वरूप समजणार असल्याचे हॉकी इंडियाच्या सूत्राने सांगितले. ‘या दुखापतीमुळेच तिला विश्रांती देण्यात आली असून तिची तज्ञाकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ती संघातील महत्त्वाची सदस्य असल्याने आगामी महत्त्वाच्या स्पर्धांआधी ती पूर्ण फिट असणे गरजेचे आहे,’ असेही या सूत्राने सांगितले.
एसीटी स्पर्धेसाठी तिच्या जागी बलजीत कौरची निवड करण्यात आली आहे. एसीटी स्पर्धा रांची येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. आशियाई स्पर्धेत खेळलेल्या संघात असणाऱ्या वैष्णवी विठ्ठल फाळके हिचीही शर्मिला देवीसमवेत बदली खेळाडू निवड करण्यात आली असून संघासोबत ती जाणार आहे. या संघात गोलरक्षक सविता पुनिया कर्णधारपदी तर डिफेंडर दीप ग्रेस एक्का हिची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. बिच्छू देवी खारिबम ही दुसरी गोलरक्षक आहे. याशिवाय निन्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, दीप ग्रेस बचावफळीत, निशा, सलिमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, मोनिका, ज्योती, बलजीत मिडफिल्डमध्ये तर लालरेमसियामी, संगीता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया या आघाडी फळीत खेळतील.
या स्पर्धेत भारताशिवाय जपान, चीन, कोरिया, मलेशिया, थायलंड या संघांचाही समावेश आहे. भारताची सलामीची लढत थायलंडविरुद्ध 27 ऑक्टोबर रोजी, त्यानंतर मलेशियाविरुद्ध 28 रोजी, चीनविरुद्ध 30 रोजी, जपानविरुद्ध 31 रोजी, कोरियाविरुद्ध 2 नोव्हेंबर रोजी भारताचे सामने होतील.
भारतीय महिला हॉकी संघ : गोलरक्षक-सविता, कर्णधार, बिच्छू देवी खारिबम. बचावफळी -निक्की प्रधान, उदिता, इशिका चौधरी, दीप ग्रेस एक्का, उपकर्णधार. मिडफिल्डर्स -निशा, सलिमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, मोनिका, ज्योती, बलजीत कौर. आघाडी फळी-लालरेमसियामी, संगीता कुमारी, दीपिका, वंदना कटारिया. बदली खेळाडू : शर्मिला देवी, वैष्णवी विठ्ठल फाळके.









